देवघर येथे निवासी बाल संस्कार शिबिर संपन्न

ऑनलाईन बालसंस्कार स्पर्धा व आनंदवारी प्रश्नमंजुषेचा बक्षीस वितरण समारंभही संपन्न
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील देवघर येथे बाल संस्कार ग्रुप, वारकरी शिक्षण संस्था व देवघर विभाग शिक्षण प्रसारक ट्रस्टच्या वतीने ह.भ.प. पांडुरंग भोईर महाराज यांच्या पुढाकारातून लहान मुलांसाठी दि. १ मे ते १५ मे असे १५ दिवस बालसंस्कार निवासी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये मुलांना व मुलींना वादन , गायन , खेळ , योगा  व अन्य कलांचे  प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिराचा समारोप रविवार दिनांक १५ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून शिवक्रांती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष पत्रकार शरद पाटील, सामाजिक कार्यकर्ते व्ही जी पाटील, वृत्तपत्रलेखक वैभव मोहन पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील , विनोद पाटील ,  कमलाकर पाटील , दिनेश भोईर , योगेश पाटील, संदीप पाटील, सचिन सावंत, अंजली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी पत्रकार शरद पाटील यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. पूर्वी आई-वडील शिकलेले नसायचे त्यामुळे मुलांवर कुठलेही संस्कार होत नव्हते. कसं जगायचं ?  कसं वागायचं ? हेच कळत नव्हतं ?  त्यामुळे भविष्यच निश्चित नसायचं . तर शिकलेले आई- वडील त्यांच्या मुलांना वेगवेगळ्या कलेचे शिकवणी वर्ग लावायचे. सुट्टीमधे त्यांना योग्य  ते प्रशिक्षण द्यायचे , त्यामुळे त्या मुलांचे भविष्य निश्चित व्हायचं. मोठे झाल्यावर त्यांना त्यांच्या कलेच्या क्षेत्रात नावलौकिक मिळायचा. ते प्रसिद्धीबरोबरच पैसाही बक्कल कमवायचे. आताही तेच आहे , गरिबांच्या मुलांना योग्य त्या प्रकारचे कलेचे शिक्षण दिले जात नाही. त्यामुळे त्या क्षेत्रांपासुन गरिबांची पोरं वंचित राहतात. यापुढे मात्र प्रत्येकाने कुठली ना कुठली कला जोपासली पाहिजे. कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात नाव कमावलेच पाहिजे. तरच ग्रामीण भागामधेही कलाकार जन्माला येतील , असे प्रतिपादन शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष व पत्रकार शरद पाटील यांनी केले. पत्रलेखक वैभव पाटील यांनी आपल्या मनोगतात हभप पांडुरंग महाराज भोईर व पत्रकार शरद पाटील यांचा उल्लेख संघर्षमूर्ती असा करताना त्यांनी आपल्या आयुष्यात मोठया संघर्षातून नावलौकिक कमावल्याचे सांगत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. या दोन्ही संघर्षमूर्ती सर्वांसाठी आदर्शवत असून त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी आपला समाजसेवेचा ध्यास पुढे अखंडितपणे जोपासावा असे मत व्यक्त केले. यावेळी सन २०२० च्या लॉकडाऊन काळात आयोजित करण्यात आलेल्या बालसंस्कार ऑनलाईन स्पर्धांचा तसेच आनंदवारी प्रश्नमंजुषा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ देखील मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.के. पाटील सर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, मेडल्स व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. 

वैभव मोहन पाटील

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त