आजूबाजुला घडणाऱ्या घटनांवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे
नवी मुंबई, पनवेल हा परिसर अत्यंत झपाट्याने विकसित होत असलेला परिसर आहे. गेल्या काही वर्षांत येथील लोकसंख्या वाऱ्याच्या वेगाने वाढली. मुंबईला पर्याय म्हणून उभ्या राहत असलेल्या या तिसऱ्या मुंबईकडे आज सर्वात सुंदर, नियोजनबद्ध, सोयीस्कर व सुरक्षित शहर म्हणून लोकांचा वास्तव्यासाठी वाढता कल आहे. वाढत चाललेल्या शहराला सोयी सुविधा पुरवण्यासाठी दोन मोठ्या महानगरपालिका येथे कार्यरत आहेत. मात्र भविष्यात या परिसराची व्याप्ती आणखी वाढणार आहे. गेल्या काही वर्षांत अतिरेकी व गुन्हेगारी कारवायांचे अनेक धागेदोरे याच परिसरात सापडले होते हे विसरून चालणार नाही. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांचे जाळे अधिक घट्ट करावे लागणार आहे. नवी मुंबईसह पनवेलच्या प्रत्येक नोडमध्ये आवश्यक मनुष्यबळासह पोलीस स्थानकांची निर्मिती, सिसिटीव्हीचे विस्तारित जाळे, महत्वाच्या व संवेदशील भागांमध्ये वाढती गस्त तसेच गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी निवासी व एमआयडीसी भागांमध्ये विशेष सुरक्षा उभारावी लागेल. यासाठी महानगरपालिकेमार्फतदेखील खाजगी सुरक्षा व देखरेख यंत्रणा नेमण्याचा पर्याय पडताळून पाहायला हरकत नाही. शहरात अनुचित प्रकार घडवण्याच्या उद्देशाने येणाऱ्या समाजविघातक शक्तींवर अंकुश ठेवण्यासाठी नागरिकांनी देखील सतर्कता दाखवत आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर बारीक लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment