हार्बर वरील एसी लोकल बंद करणे हितावह
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
एसी लोकल तिकिटाचे दर कमी केल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वातानुकूलित लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशी संख्येत ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकीकडे मध्य मार्गावर एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असताना दुसरीकडे हार्बर मार्गावर मात्र अल्प प्रतिसाद आहे. मे च्या पहिल्या आठवड्यात एसी लोकलने प्रवास केलेल्या एकूण २८ हजार प्रवाशांपैकी २५ हजार प्रवाशी एकट्या मध्य मार्गावरील आहेत तर हार्बर मार्गावर केवळ ३ हजार प्रवाशांनी आठवडाभरात एसी लोकलमधून प्रवास केला आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर एसी लोकल फार प्रभावी ठरलेल्या नाहीत हे स्पष्ट होत आहे. उलट एसी लोकल फलाटावर लागल्यावर प्रवाशी या गाडीत चढत नसल्याने स्थानकातील प्रवाशी संख्या वाढत जाते व त्याचा भार येणाऱ्या पुढील लोकलवर पडताना दिसत आहे. याच कारणास्तव ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकल्स यापूर्वीच पूर्णतः बंद करण्यात आल्या आहेत. हार्बर मार्गावरील देखील एसी लोकलच्या फेऱ्या कमी करण्यात आलेल्या असल्या तरी प्रवाशांचा ओढा या गाड्यांकडे अत्यंत कमी असल्याने एसी लोकलचा थाट या मार्गावर पूर्णतः बंद करणेच हितावह आहे. प्रवाशांच्या दृष्टीने निरुपयोगी व रेल्वेच्या प्रशासनाच्या दृष्टीने पांढरा हत्ती ठरत असलेल्या एसी लोकल्सची हार्बर मार्गावरील सर्वसामान्य प्रवाशांसाठी तूर्तास तरी गरज उरलेली नाही असेच दिसते.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment