वाहनविक्रीवर नियंत्रण हवे
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
मुंबईतील वाहन संख्येवर कुणाचेही नियंत्रण नाही. शहरात रोज किती वाहने येतात व जातात याची मोजदाद करणारी यंत्रणाच नाही. त्यामुळे भरमसाठ संख्येने वाहने रोज रस्त्यांवर धावत आहेत. सर्वत्र करण्यात येत असलेली रस्त्यांची कामे, महिनोंमहिने सुरू असलेली मेट्रोची कामे व त्यात रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्किंग केलेली वाहने यामुळे सकाळ व सायंकाळच्या वेळेत मुंबईतील रस्ते वाहनांच्या रांगांनी व्यापून गेलेले असतात. प्रचंड संख्येने वाहने रस्त्यावर उतरत असल्याने सर्वत्र वाहतूक कोंडी आजकाल नित्याचीच झाली आहे. टोल नाक्यांवर तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. दररोजची ही वाहतूक कोंडी लोकांचा वेळ, इंधन व पैसा यांचा अपव्यय करणारी ठरत आहे. यातून वाहनांचे छोटेमोठे अपघात आलेच. मुंबईत वाहन विक्रीवर अजिबात नियंत्रण नाही. त्यामुळे दररोज हजारोंच्या संख्येत नवी वाहने नोंदणी होऊन रस्त्यावर येत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे वाहतूक नियोजनाचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात वाहनविक्रीवर कुठेतरी निर्बंध आणण्याची गरज निर्माण झाली आहे. दररोजच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्याचा हाच एकमेव पर्याय आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक सेवांची सहज उपलब्धतादेखील वाढवणे गरजेचे आहे. मोनो, मेट्रो, उपनगरीय रेल्वे वाहतूक आज महत्वपूर्ण आहे मात्र वाहतूक व्यवस्थेचा विस्फोट होण्याआधी ती सुरू व्हायला हवी. लोकल ट्रेन, मेट्रो, मोनो रेल यांचे सातत्य व सुनियोजन गर्दीवर मात करणारे ठरेल. मुंबईच्या दिशेने रोज सकाळी वाहनांनी धाव घेणारे व सायंकाळी घरी परतणारे गर्दीचे लोंढे थोपवण्यासाठी मध्य व दक्षिण मुंबईतील काही कार्यालये उपनगरांत स्थलांतरित करण्याचा पर्यायदेखील पडताळून पाहायला हवा. रस्ते वाहतूकिवर पडणारा ताण पाहता ती अधिक सुरक्षित करण्याची गरज आहे. पार्किंगची समस्या आज सर्वत्र उग्र रूप धारण करून आहे. रस्ते अपघात तर नित्याचेच झाले आहेत. यासाठी वाहन नियंत्रण व नियोजन हे करावेच लागेल. महानगरपालिका, वाहतूक यंत्रणा, एमएमआरडीए, एमएसआरडीसी यासारख्या यंत्रणांनी एकत्र येऊन मुंबईतील वाहतूक कोंडीवर मार्ग काढायला हवा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment