दै नवे शहर वर्धापन दिन विशेष
आजच्या सोशल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या जगात वृत्तपत्र सुरू करणे आणि ते वर्षानुवर्षे अविरतपणे चालवणे हे वाटते तितके सोपे नक्कीच राहिलेले नाही. एखादी घटना घडली की ती काही क्षणांत सर्वदूर पोहोचवणारी प्रसार माध्यमे आज उपलब्ध असल्यामुळे दररोजच्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या वर्तमानपत्रांचे स्थान डळमळीत होऊ पाहत आहे. त्यात कोरोना महामारीच्या कालखंडात वृत्तपत्रे नसल्यात जमा होती. राष्ट्रीय, राज्य पातळीवरील अनेक नामांकित वृत्तपत्रांना आर्थिक व राजकीय पाठबळ असल्याने त्यांना या परिस्थितीचा फार फटका बसलेला नाही. मात्र स्थानिक स्तरावरील अनेक मासिके, नियतकालिके, साप्ताहिके व दैनिक वृत्तपत्रे याने सर्वाधिक बाधित झाली आहेत. वृत्तपत्रे कशी चालवावी असा प्रश्न अनेक वृत्तपत्रांच्या मालकांसमोर उभा आहे. मुंबईसारख्या एकविसाव्या शतकातील नगरीत गेली पंचवीस वर्षे वास्तव्य करत असताना येथील अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके मी अगदी जवळून अनुभवत व वाचत आहे. मात्र आपले वेगळेपण कायम राखून सलग पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ नियमितपणे प्रकाशित होणारे वृत्तपत्र म्हणून दै नवे शहर हे एकमेवाद्वितीयच आहे. वृत्तपत्राला पाहता पाहता २९ वर्षे पूर्ण झाली. नवी मुंबईतून नियमित प्रसारित होणाऱ्या ह्या वृत्तपत्राची वाटचाल खरेच गौरवास्पदच आहे. मागील विसेक वर्षांपासून मी या वृत्तपत्राचा नियमित वाचक व लेखक आहे. साप्ताहिकाचे रूपांतर कालांतराने दैनिकात झाले व हे दैनिक आज दररोज ताज्या बातम्या, घडामोडी, ज्वलंत लेख घेऊन वाचकांची भूक भागवत आहे. खरेतर इतकी वर्षे एखादे वृत्तपत्र स्थानिक पातळीवर चालवणे कसरतच आहे. मात्र नवे शहर ने ही कसरत पूर्ण तर केलीच पण साप्ताहिकाचे दैनिकात व त्यानंतर आता डिजिटल चॅनेलमध्येदेखील रूपांतर करून पत्रकारीतेतील मैलाचा दगड गाठला आहे. राज्यभरातील अनेक मराठी वृत्तपत्रांना घरघर लागली असताना नवी मुंबईसारख्या हायटेक शहरात दिमाखात सुरू असणारे वृत्तपत्र म्हणजे नवे शहर. आजकाल दररोज मिळणारी बहुतांशी वृत्तपत्रे आपण उघडून पहिली तर कोणत्या तरी राजकीय पक्षास, विचारास, पंथास, धर्मास किंवा संस्थेस वाहिलेली असल्याचे आढळून येते. मात्र नवे शहर ने टिकवून ठेवलेला निपक्षपतीपणा व प्रामाणिकपणा काबिलेतरीफच आहे. अर्थात याचे संपूर्ण श्रेय या वृत्तपत्राचे मालक कैलाशचंद्र गिदोडिया व त्यांच्या टीमला द्यायलाच हवे. आपल्या खाजगी व्यवसायाच्या माध्यमातून शेकडो हातांना रोजगार उपलब्ध करून देणारे कैलाशचंद्र जी दै नवे शहरसारखे मराठी वृत्तपत्र इतके वर्षे नियमित चालवत आहेत यावर खरेतर विश्वास बसत नाही. या वृत्तपत्राचे संपादक श्री शैलेश जाधव व त्यांच्यामागील संपूर्ण संपादकीय टीमची वृत्तपत्र चालवण्यासाठी व नावारूपास आणण्यासाठी सुरू असणारी धडपड आपल्या सहज लक्षात येते. नवोदित लेखकांना संधी देऊन त्यांना प्रोत्साहित करण्याचे मोठे कसब त्यांच्यात आहे. यामुळेच माझ्यासारख्या पत्रलेखकांसाठी 'वाचकांचे मत' हे सदरदेखील त्यांनी सन्मानपूर्वक नवे शहरमध्ये सुरू केले व टिकवून ठेवले आहे. याच वृत्तपत्रातून मला आरोग्य जनजागृती करण्यासाठी एक मोठी संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. मी ज्या आरोग्य क्षेत्रात काम करतो त्या विभागासाठी व आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या आरोग्य योजना लोकांपर्यंत विविध माध्यमांद्वारे पोहोचवण्यासाठी सतत धडपडत असतो. नवे शहर मध्ये आरोग्य या विषयावर 'आरोग्यमंथन' मालिका सुरू करण्याची कल्पना व संधी या वृत्तपत्राने मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल खरेतर मी वृत्तपत्राचे आभारच मानतो. ज्या लेखमालिकेची मी केवळ कल्पनाच करत होतो त्या दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या आरोग्यमंथन या लेखमालिकेचे नवे शहर मध्ये तब्बल १२५ लेख प्रकाशित झाले. त्यानंतर शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य शिक्षण, माहिती व संपर्क विभागाने याच लेखमालिकेचे आरोग्यमंथन हे माझे पुस्तक कोरोनाकाळात प्रकाशित केले जे आज अनेक आरोग्य कर्मचारी, नागरिकांना मार्गदर्शक ठरत आहे. विभागाच्या बहुतांश योजना व उपक्रमांचा समावेश असणारे हे पुस्तक विभागासाठी अमूल्य ठेवा बनला आहे. नवे शहरच्या वाचकांना रोज स्टॉल वर उपलब्ध होणारे हे वर्तमानपत्र वेबसाईटवर देखील नियमित उपलब्ध होत असल्याने या वृत्तपत्राचे वाचक सातासमुद्रापार देखील नवे शहर वाचत असतील एव्हढे नक्की. नवे शहर नवी मुंबईच्या जडणघडणीतील एक महत्वाचा दुवा असून सर्व स्तरांतील मान्यवरांनी त्याची वेळोवेळी पुष्टी केलेली आहे. दरवर्षी १ मे रोजी आपला वर्धापन दिन सोहळा साजरा करत असताना कला, क्रीडा व शिक्षण क्षेत्रांतील विविध गुणवंताना सन्मानाने गौरवण्याची आपली परंपरा नवे शहरने जोपासली आहे हेदेखील कौतुकास्पदच. या वृत्तपत्रात उपसंपादक पदावर कार्यरत असणारे आमचे मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार राजेंद्र घरत यांची अनुभवी, अभ्यासू, दूरदृष्टी, शोधक वृत्ती देखील या वृत्तपत्राच्या भरभराटीस कामी येत आहे. नवे शहर या प्रिंट मीडियातील वृत्तपत्राला थेट डिजिटल रूप देत सोशल मीडियावर चॅनेलच्या रुपात पुढे आणले व या चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेक प्रसिद्ध, राजकारणी, उद्योजक, प्रशासक, कलावंत, समाजसेवक, असामान्य व्यक्तिमत्त्वांच्या नामांकित न्युज चॅनल्सना लाजवतील अशा मुलाखती प्रसारित करत नवे शहरच्या दैदिप्यमान वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला. त्यामुळे नवी मुंबईत दररोज घडणाऱ्या विविध घडामोडींचे सांगोपांग अस्तित्व दाखवणारे नवे शहर हे वृत्तपत्र उत्तरोत्तर बहरत आहे व अखंडीतपणे लोकांचे ज्ञान प्रज्वलित करत आहे याचा ता वृत्तपत्राचा वाचक, दर्शक, लेखक म्हणून मला सार्थ अभिमान आहे. वर्धापन दिनानिमित्त नवे शहरचे मालक, प्रकाशक, संपादक, उपसंपादक, सर्व वार्ताहर, डीटीपी ऑपरेटर, संगणक चालक, कर्मचारी, वाचक व लेखकांना मनापासून शुभेच्छा !
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment