आरोग्य सेवेचा ध्यास घेतलेली अनोखी व्यक्तिमत्वे
डॉ सतीश पवार सर व डॉ अर्चना पाटील मॅडम यांची सेवानिवृत्ती
आरोग्य सेवेतील अनेक अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती आजवर पाहिली. मात्र आज ज्या अधिकाऱ्यांना नियत वयोमानानुसार आरोग्य विभाग निरोप देतोय तो निरोप नक्कीच मनाची घालमेल वाढवणारा आहे. राज्याच्या आरोग्य सेवेचा मजबूत कणा म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते माजी आरोग्य संचालक व अतिरिक्त अभियान संचालक डॉ सतीश पवार सर तसेच आरोग्य संचालिका डॉ अर्चना पाटील मॅडम यांची सेवानिवृत्ती विभागात नक्कीच एक उणीव निर्माण करणारी आहे. विभागाचे कुठलेही विषय, उपक्रम, योजना व धोरणात्मक निर्णय या अधिकाऱ्यांशिवाय पूर्णत्वास गेले नाहीत असे कुशल, खंबीर नेतृत्वकौशल्य धारण केलेले हे दोन्ही अधिकारी. आरोग्य सेवेला वाहून घेतलेल्या व विभागासाठी अक्षरशः झपाटल्यागत काम करणाऱ्या ह्या दोन्ही अधिकाऱ्यांनी कामकाजाच्या आढाव्यासाठी अख्खा महाराष्ट्र न जाणे किती वेळा पिंजून काढला असणार! आरोग्य व्यवस्थेची अगदी खडा न खडा माहिती असल्यामुळे त्यांच्या कामकाजात कमालीची सहजता दिसून येते. कुठल्याही किचकट, क्लिष्ट व अडचणीच्या विषयात सुकर मार्ग काढण्यात त्यांचा हातखंडा. कुठल्याही प्रसंगात त्यांना तणावात किंवा संभ्रमात असलेले मी तरी पाहिलेले नाही. धडाडीची निर्णयक्षमता व त्वरित शंकानिरसन यामुळे विभागातील सर्वच अधिकारी आपापल्या विषयात त्यांचे मार्गदर्शन घेताना दिसले. त्यामुळे पवार सर असो की मॅडम दोघांकडे विभागातील अधिकारी व कर्मचारी एक सुयोग्य मार्गदर्शक म्हणून पाहतात. आरोग्य सेवेकडे त्यांनी कधी नोकरी म्हणून पाहिलेच नाही. सदासर्वदा, पूर्णवेळ अगदी सुट्टीच्या दिवशीदेखील ते विभागाच्या कामात व्यस्त दिसतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ते व्यक्तीशः ओळखतात त्यांच्याशी नियमित संवाद साधतात. सकाळी कार्यालयात पाऊल ठेवल्यापासून संध्याकाळी उशिरा कार्यालय सोडेपर्यंत एकापाठोपाठ विभागाच्या बैठका व दौऱ्यांमध्ये कायम व्यस्त असणाऱ्या या दोन्ही अधिकाऱ्यांना खाजगी आयुष्य आहे कि नाही इतपत शंका येते. आपल्या पतीपत्नीच्या नात्यातील घट्ट बंध त्यांनी कधीही कामकाजात जाणवू दिले नाही. व्यस्त दिनक्रमात दुपारचे जेवण कधीही न करणाऱ्या पवार सरांना दिवसभर कामासाठी इतकी ऊर्जा मिळते कुठून हा मला सतत पडणारा प्रश्न. आपल्याला मिळालेल्या जबाबदारीत पूर्ण क्षमतेने, अक्षरशः झोकून देऊन त्यांनी काम केले. अनेक अवघड प्रसंगांत त्यांनी अगदी कुशलतेने मार्ग काढत उद्दिष्ट साध्य करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडीअडचणीतुन बाहेर काढणारे, त्यांना सुटकेची वाट दाखवणारे प्रसंगी योग्य समज देणारे पवार सरांसारखे अधिकारी फार दुर्मिळच. मला माझ्या जवळपास १३ वर्षांच्या या कार्यालयातील कारकिर्दीत अगदी सुरुवातीपासून व जवळून मार्गदर्शन करणारे, कामकाजात दर वेळेस प्रोत्साहित करणारे, न कळणाऱ्या विषयातील खाचाखोणा समजावून सांगणारे व व्यक्तिगत पातळीवर मदतीसाठी सदैव तत्पर राहिलेले पवार सर मी कधीही विसरू शकत नाही. विभागाचे अनेक पैलू त्यांच्याकडूनच मला उलगडले. त्यामुळेच माझ्या आयुष्यातील त्यांचे स्थान नेहमीच अढळ राहील. आरोग्य विभागात राबवल्या जाणाऱ्या अनेक धोरणात्मक निर्णयांचा तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रारंभीच्या प्रकल्प आराखड्याचा पाया रचण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळेच राज्यस्तरीय व केंद्रीय पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये त्यांची प्रतिमा नेहमीच सन्मानजनक राहिली आहे. निर्णयक्षमतेत कमालीची प्रगल्भता दाखवणारे पवार साहेब आपल्या आईवडिलांच्या आजरपणात काहीसे हळवे व संवेदनशील झालेलेदेखील मी पाहिले. मात्र त्या सर्व विपरिततेतून बाहेर पडून ते पुन्हा नव्या जोमाने कामाला लागायचे. एखाद्या न पटणाऱ्या विषयात कठोर होताना व एखाद्याच्या अनावधानाच्या चुकीत पण योग्य कारणामिमांसेत खंबीरपणे पाठीराखा होताना मी सरांना पाहिलेय. त्यामुळेच पवार सरांकडे विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे संकटमोचक म्हणूनदेखील पाहिले जाते. जवळपास तीन तपांची प्रदीर्घ सेवा बजावलेले हे दोन्ही अधिकारी विभागाचे खरेखुरे पितामह ठरले. त्यामुळेच त्यांच्या निवृत्तीने निर्माण होणारी पोकळी न भरणारी आहे. त्यांच्याशिवाय आरोग्य विभागाची कल्पना धाकधूक वाढवणारी आहे. खरेतर त्यांची सेवानिवृत्तीच मान्य होण्यासारखीच नाही. आरोग्य सेवेचा अनोखा ध्यास घेतलेली अशी व्यक्तिमत्वे कधी रिटायर्ड होऊच शकत नाही. त्यांची आरोग्य सेवेतील ही दैदिप्यमान वाटचाल अशीच पुढे सुरू राहावी असेच सतत वाटते. त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भावनावेशाने केलेला हा लेखप्रपंच केवळ एक औपचारिकता आहे. त्यासाठी शब्द सुचतच नव्हते पण व्यक्त झालो नसतो तर मन अपराधी झाले असते. त्यामुळे सुचले ते लिहिले. पवार सर व मॅडमना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्याइतपत माझी मजल नाही मात्र त्यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी मी मनापासुन शुभेच्छा चिंतितो. त्यांनी आरोग्य सेवेचा घेतलेला वसा कधी सोडूच नये अशी मनोकामनाही व्यक्त करतो व थांबतो. वैभव
Comments
Post a Comment