डॉ उल्हास मारुळकर यांची सेवानिवृत्ती

आरोग्य सेवेतील अभ्यासू आणि जिज्ञासू व्यक्तिमत्व
आरोग्य विभागातील आणखी एक अधिकारी आज नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहेत. आरोग्य सेवेत तब्बल ३६ वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावून आरोग्य उपसंचालक डॉ उल्हास मारुळकर यांनी सेवेतून एक्झिट घेतली. आपल्या संपूर्ण सेवाकालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये व राज्यस्तरीय विषयांमध्ये काम करणारे डॉ मारुळकर अत्यंत अभ्यासू, कर्तव्यनिष्ठ व संयमी अधिकारी म्हणून परिचित आहेत. सध्या राज्यस्तरावरील रुग्णालये कक्षाचा कार्यभार त्यांच्याकडे होता. विभागातील मोठया प्रमाणावरील रिक्त पदांमुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांवर अनेक विषयांची जबाबदारी आहे. मात्र डॉ मारुळकर यांनी आपल्यावर सोपवलेली कामगिरी कुठलीही उणीव जाणवू न देता यथायोग्य बजावली. मग ते महाराष्ट्र वैद्यकीय सेवा हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी अथवा नुकसान प्रतिबंध अधिनियम, २०१० मध्ये सुधारणा करण्यासाठीचा मसुदा तयार करण्यातील योगदान असो की वैद्यकीय देयकांची प्रतिपूर्ती किंवा अलीकडेच संरक्षण खात्याच्या आरोग्य संस्था विभागाकडे हस्तांतरित करण्याचा विषय असो प्रत्येक कामात त्यांनी दाखवलेली तत्परता लक्षात राहण्याजोगी आहे. मूळचे बालरोगतज्ञ असलेल्या डॉ मारुळकर यांनी राज्यातील अनेक दुर्गम भागात सेवा बजावलेली आहे. शासन निर्णय व अधिनियमांच्या बाबतीत त्यांचा गाढा अभ्यास आहे. कामकाजानिमित्त त्यांचेशी सातत्याने संपर्क यायचा तेव्हा त्यांची प्रत्येक विषयातील पारंगतता व चिकित्सक वृत्तीचे दर्शन घडायचे. माझ्या वर्तमानपत्रातील लेखांवर आवर्जून व अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया देणारे डॉ मारुळकर माझ्या कायमच लक्षात राहतील. सकाळी कार्यालयात येताना सिएसएमटी स्थानकातून आरोग्य भवन पर्यंतच्या दहा मिनिटांच्या पायी प्रवासात त्यांच्याशी एखाद्या सामाजिक विषयावर कार्यालयात पोहोचेपर्यंत अनेकदा मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. कोरोना काळात कोरोना जनजागृतीसाठी मी केलेल्या एका कवितेच्या व्हिडिओत त्यांनी माझ्या विनंतीवर कवितेचे एक कडवेदेखील सादर केले होते ती आठवण कायमच राहील. निवृत्तीनंतर एखाद्या रुग्णालयात किंवा स्वतः खाजगी बालरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय क्षेत्रात सेवा सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांची सेवेतील निवृत्ती विभागामध्ये आणखी एका चांगल्या अधिकाऱ्याची उणीव निर्माण करणारी ठरणार आहे. डॉ मारुळकर सरांना निवृत्तीनंतरचे आयुष्य सुख, समाधान, निरोगी व आरोग्य सेवा देण्यात जावो ह्याच सदिच्छा. 

वैभव 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त