उत्कंठा "धर्मवीर" चित्रपटाची

झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला आणि प्रविण तरडे यांच्या लेखन दिग्दर्शनाने सजलेला 'धर्मवीर मु.पो. ठाणे' हा चित्रपट येत्या 13 मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. ठाणेच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या अनोख्या राजकीय शैलीमुळे ओळख निर्माण झालेल्या दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ह्या जीवनपटाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. आनंद दिघे यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना त्यांच्या आक्रमक स्वभाव, माणुसकी व राजकारणापलीकडील भूमिकेची जाणीव आहे. मात्र ज्यांनी त्यांना कधीही पाहिले नाही वा संपर्कात आले नाहीत असे लाखो लोकदेखील त्यांच्या कार्याने प्रभावित आहेत. अभिनेता प्रसाद ओक यांच्या अगदी समरूप भूमिकेने या चित्रपटाला न्याय दिला असेल यात शंका वाटत नाही. पूर्वीच्या अवाढव्य ठाणे जिल्ह्यातील गावागावात दिघे साहेबांचा दांडगा जनसंपर्क, शाखा उघडण्यात त्यांचे योगदान, ठाण्याच्या टेंभी नाक्यावरील त्यांचे लोक न्यायालय व कायद्यापलीकडे जाऊन गोरगरीब, गरजू, अन्यायग्रस्तांना त्यांनी केलेली मदत उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. आनंद दिघे जगलेले निस्वार्थी, आक्रमक पण लोकोपयोगी जीवन आज सर्वच राजकीय नेत्यांना प्रेरणादायी आहे. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांवर आधारित धर्मवीर या चित्रपटाची उत्कंठा सर्वांच्याच मनात आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त