देशमुख काका एपीएमसीतुन सेवानिवृत्त

हसतमुख, हसवणारे, मेव्हणे व पाहुण्यांना सांभाळणारे देशमुख काका
वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनंत बाळकृष्ण देशमुख (देशमुख काका) हे बाजार समितीतील ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. सतत हसतमुख, हसवणारे व मदतीला सदैव धावून येणारे देशमुख काका आमचे अत्यंत जवळचे कौटुंबिक स्नेही. माझे वडील आणि देशमुख काका दोघेही एपीएमसीमध्ये नोकरीला होते. ऐरोलीला शाळेत असताना आम्ही एकाच रो हाऊसमध्ये राहायचो. त्यामुळे वडील शनिवार रविवारी गावी गेल्यावर मी त्यांच्याकडेच असायचो. नेहमी इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशमुख काकांना कधी टेन्शनमध्ये असलेले मी पाहिले नाही. उलट एखाद्या अडचणीच्या प्रसंगी ते धीर देतात, अगदीच मूडमध्ये असतील तर त्यांच्या आवडीचे पोवाडे, गाणी ऐकवतात. कौटुंबिक व आप्तेष्टांमध्येदेखील ते सर्वांना प्रिय आहेत. प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमामध्ये आवर्जून हजेरी लावणारे काका त्या कार्यक्रमाचा भाग कधी होऊन जातात कळतही नाही. अगदी घरातलाच कार्यक्रम असल्यासारखे ते प्रत्येक कामात हातभार लावत असतात. ऐरोलीनंतर घणसोलीला राहायला आल्यावरही आम्ही अनेक वर्षे एकाच सोसायटीत राहिलो. सोसायटीतील सर्वांच्या सुखदुःखात व सोसायटीच्या उपक्रमांत अगदी हिरीरीने सहभाग घेऊन मदतीचा हात पुढे करताना आम्ही त्यांना पाहिलंय. त्यांच्यासोबत निर्माण झालेले ऋणानुबंध कधीही विसरता येण्यासारखे नाहीत. एपीएमसी बाजार समितीत त्यांचेवर प्रेम करणारे रमाकांत परब यांच्यासारखे अनेक जिवाभावाचे सहकारी मित्र त्यांनी मिळवले. नातेवाईकांमध्ये पंढरी हिंदुराव या त्यांच्या मेव्हण्यावर त्यांचे विशेष प्रेम. गावाकडून नोकरीनिमित्त शहरात आलेल्या पंढरी व इतर भाचेकंपनीला त्यांनी सर्वतोपरी मदत करत स्वतःच्या पायावर उभे राहायला मदत केली ज्यामुळे ही सर्व मंडळी आज बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाली आहेत. असे सर्वांच्याच मदतीला धावून जाणाऱ्या देशमुख काकांनी मेव्हणे व पाहुण्यांनाही सांभाळले. आज ते सेवानिवृत्त झाले तरी त्यांच्यातील काम करण्याचा उत्साह वाखाणण्याजागा आहे. तरुणांना लाजवेल असे निरोगी व्यक्तिमत्त्व, इतरांना नेहमी हसत ठेवण्याची लकब यामुळे ३१ तारखेला त्यांच्या कार्यालयात व संध्याकाळी आप्तेष्टांसाठी उलवे येथील एका सभागृहात त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित भरगच्च कार्यक्रमात सर्वांनीच त्यांच्या प्रति आदरभावना व्यक्त केल्या. आज ते आपल्या गावानजीकच उलवे नोडममध्ये स्थायीक झाले असून पत्नी व त्यांची स्थिरस्थावर झालेली प्रितेश व प्रियांका ही दोन मुले असा त्यांचा प्रापंचिक डोलारा आहे. निवृत्तीनंतर कौटुंबिक कबिल्यातच एकमेकांच्या सुखदुःखात साथ देत राहण्याचा मानस ते व्यक्त करतात. उलवे येथे ३१ तारखेच्या कार्यक्रमात आम्हीदेखील सहकुटुंब हजेरी लावून त्यांना निवृत्तीनंतरच्या सुखकर आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, सोबत माझी भटकंती व आरोग्यमंथन ही दोन पुस्तके भेट दिली. आजवर निरोगी, निकोप व बहारदार आयुष्य जगलेल्या देशमुख काकांना यापुढेदेखील चांगले आरोग्य व सुखासमाधानाचे आयुष्य लाभो हीच मनोकामना. 

वैभव 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त