समाजभान जोपासणारा जॉय ऑफ गीविंग ग्रुप

समाजभान जपणारा जॉय ऑफ गीविंग ग्रुप
कोरोना काळामध्‍ये अनेक सामाजिक संस्‍था व व्‍यक्‍तींनी समाजभान जोपासत गरजूंसाठी सढळ हस्‍ते मदत केली. यात जिवनावश्‍यक वस्‍तुंपासून दररोजच्‍या जेवणापर्यंत सर्व प्रकारची मदत यथाशक्‍ती करण्‍याचा प्रयत्‍न समाजातील संवेदनशील घटकांनी केला. वास्‍ताविक स्वार्थ व वैयक्तिक हितासाठी झगडणाऱ्या आजच्या दुनियेत सामाजिक बांधिलकी व माणुसकी लोप पावत चालली आहे. प्रत्येक जण इथे फक्त स्वतःपुरताच विचार करतो. यामुळे गरीब श्रीमंत दरी समाजात वाढत चालली आहे. ही दरी कमी करायची असेल समाजातील गरीब, दुर्बल व वंचित घटकांचा विचार कुणीतरी करायला हवा. त्यांच्या अपेक्षा फार नसल्या तरी जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची मदत त्यांना मिळायला हवी. यासाठी समाजातील धनाढ्य, उद्योगपती, मोठमोठ्या सामाजिक संस्था यांचेमार्फत जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहेच पण समाजभान जपणाऱ्या संवेदनशील नागरिकांचा सहभागदेखील मोठा बदल घडवू शकतो. कोरोनाने आपल्‍याला बरेच काही शिकवले आहे. पैसा, संपत्‍ती, मालमत्‍ता या बाबी क्षणभंकूर असुन या सर्वांपेक्षा व्‍यक्‍तीचे आरोग्‍य व इतरांना केलेली मदत आयुष्‍यात सर्वात उपयोगी पडते. याच जाणीवेतुन अनेक मोठमोठया संस्‍था, कंपन्‍या, उदयोग, धनाढयांनी कोरोना काळात लोकांच्‍या मदतीला धावून जात मोठी मदत उभी केली व त्‍यातून सामाजिक बांधिलकीचे एक अनोखे रुप पाहायला मिळाले. अशाच प्रकारे सामाजिक बांधीलकीतून एकत्र आलेला "जॉय ऑफ गिव्हिंग" हा आमचा सोशल ग्रुप सातत्याने गरीब, गरजू लोकांसाठी विविध उपक्रम राबवत समाजभान जोपासण्याचे काम करत आहे. आधुनिक तंत्रज्ञान व एशोआरामाच्या दुनियेत हरवत चाललेल्या आजच्या तरुण पिढीला सामाजिक व्यवस्था व बांधिलकीचे फार भानच राहिलेले नाही. पैसा, पैसा व केवळ पैसा करत आपल्या आयुष्यातील महत्वाची वर्षे कोणत्याही सामाजिक जबाबदारीविणा घालवत असलेली आजची तरुण पिढी भविष्‍याच्‍या दृष्‍टीने चिंतेची बाब आहे. मात्र तरीदेखील समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो व समाजातील गरीब, गरजू, दुर्लक्षित घटकांसाठी आपल्या कमाईतील काही भाग किंवा काही वेळ देता यावा अनेक जण अक्षरशः धडपडत असतात. त्यातीलच एक हरहुन्‍नरी व्‍यक्‍ती म्हणजे जोगेश्वरीचे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त श्री गणेश हिरवे सर. पेशाने शिक्षक असलेल्या गणेश हिरवे यांना समाजकार्याची भारी हौस नव्हे तर व्‍यसनच लागले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र या समाजसेवेला आपले सोबती व समाजातील सधन व्यक्तींची साथ लाभावी या हेतूने त्यांनी "जॉय ऑफ गिव्हिंग" हा ग्रुप तयार केला. मुंबई व उपनगरांमधील अनेक भागांत या ग्रुपचे सभासद आज पसरले असून यातील प्रत्येकजण उदार व उदात्त हेतूने प्रेरित आहे. प्रत्येकाच्या कार्याबहुल्यात अधिक वेळ त्यासाठी देता येत नसल्याने व्हाट्सअपच्या माध्यमातून या ग्रुपचे सर्व सदस्य जोडले गेले आहेत. जे या ग्रुपद्वारे दररोज एकमेकांच्या संपर्कात असतात. सर्वाना सोयीचा दिवस साधून या ग्रुपचे सदस्य सातत्याने विविध ग्रामीण व आदिवासी भागात दौरे करतात व तेथील गरजू लोकांना, वृद्धांना, अनाथांना, विद्यार्थ्यांना विविध गरजेच्या वस्तूंची मदत करतात. आजवर या ग्रुपने अनेक लोकोपयोगी उपक्रम विविध भागांत राबवलेले आहेत. सध्‍याच्‍या कोरोना काळात किराणा किट, आरोग्य किट व जीवनावश्यक वस्तू यांचे वाटप गरजुंना करण्‍यात आले. लॉकडाऊन काळात आजवर जवळपास सुमारे पाच हजार गोरगरीब, वंचित व गरजू कुटुंबाना किराणा किट देण्याच काम संस्थेतर्फे करण्यात आले व अजुनही हे काम नियमितपणे सुरू आहे.  कोणताही स्वार्थ व प्रसिद्धीची अपेक्षा न बाळगता सोशल माध्यमावरील हया ग्रुपचे सदस्‍य सढळ हस्‍ते आर्थिक व वस्‍तूरुपी योगदान देऊन संस्‍थेचा प्रत्‍येक उपक्रम यशस्‍वी करत असतात. सन २०२१-२२ मध्ये जॉय ने लोकडाऊन काळात विविध स्पर्धांचे आयोजन केलं होत त्याचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच ५, जून रोजी करण्यात आला,यावेळी समाजात चांगले काम करणाऱ्या संस्थाना विशेष पुरस्कार आणि महिलांना नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच  सधन व दानशूर व्‍यक्‍तींनी दुर्बल घटकांना मदत केली तरच सामाजिक संतूलन राखले जाईल या उदात्‍त भावनेने जॉयचे सभासद आपला दिनक्रम सांभाळून समाजकार्यात व्‍यस्‍त आहेत. समाजातील सर्व घटकांपर्यंत हा आनंद व समाधान पोहोचवायचा असेल तर तरुणाईने पुढाकार घेऊन जागोजागी अशा प्रकारचे सामाजिक बांधिलकी जोपासणारे सोशल ग्रुप सोशल ग्रुप तयार होणे गरजेचे असल्‍याचे संस्‍थेचे संस्‍थापक हिरवे सर सांगतात. सोशल माध्यमांचा वापर चांगल्या व समाजोपयोगी कामासाठी कशा प्रकारे करता येतो याचा उत्‍तम आदर्श जॉय ऑफ गिव्हिंगने समाजासमोर उभा केलेला आहे.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त