एसएससी परीक्षेचा १००% निकाल - के जी पाटील विद्यालय, देवघर व सरस्वती गणपत पाटील विद्यालय, केलठणची दैदिप्यमान कामगिरी

दोन्ही शाळांनी राखली परंपरा कायम
देवघर विभाग शिक्षण प्रसारक ट्रस्‍टच्‍या के.जी.पाटील विदयालय, देवघर व सरस्‍वती गणपत पाटील विदयालय, केळठण या दोन्‍ही शाळांचा यंदाचा दहावीचा (एसएससी) निकाल १०० टक्‍के लागला आहे. ८वी ते १०वी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण देणाऱ्या या दोन्‍ही शाळांनी आपल्‍या एसएससीच्‍या सर्वोत्‍तम निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. के. जी. पाटील विदयालय, देवघर येथील ३१ विदयार्थी व सरस्‍वती गणपत पाटील, केळठण या शाळेतील ३२ विदयार्थी दहावी बोर्डाच्‍या परिक्षेला यंदा बसले होते. सर्वच्‍या सर्व विदयार्थी चांगल्या गुणांनी उत्‍तीर्ण झाले असुन उत्‍तीर्ण विदयार्थी, दोन्‍ही शाळांमधील शिक्षक, मुख्‍याध्‍यापक तसेच संस्‍थेचे सर्व स्‍तरांतुन अभिनंदन करण्‍यात येत आहे. के जी पाटील विद्यालयात नाज शानहवाज खान याने ८७% गुण मिळवत शाळेत पहिला, उल्का पुंडलीक पाटील हिने ८३.२०% गुण मिळवत दुसरा तर साक्षी रविंद्र भोईर हिने ७९.४०% गुण मिळवत तिसरा येण्याचा बहुमान मिळवला. १९९९ पासून कार्यरत असलेल्या व देवघर गावचे शिक्षणप्रेमी व्यावसायीक के जी पाटील यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या देवघर विभाग शिक्षण ट्रस्टने सुरुवातीला देवघर व त्यानंतर केलठण या दुर्गम भागात आपले ज्ञानदानाचे निस्वार्थी कार्य पसरवले व त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. गेल्‍या अनेक वर्षांपासुन ग्रामीण व आदिवासी भागांमध्‍ये ज्ञानदानाचे कार्य करत असलेल्या या शाळांमध्ये शिकलेले अनेक विदयार्थी उच्‍च शिक्षण घेऊन करिअर घडवत विविध क्षेत्रांमध्‍ये उच्‍च स्‍थानी कार्यरत आहेत. शाळांचे कार्य व प्रगती पाहून अनेक सामाजिक संस्‍थांनी शाळा व विदयार्थ्‍यांच्‍या मदतीसाठी हात पुढे केलेला आहे. शाळेचे माजी विदयार्थी असलेले व उच्‍च शिक्षण घेऊन मुंबईतील एका मोठ्या आयटी कंपनीमध्‍ये तांत्रिक पदावर असलेले श्री कल्‍पेश पुंडलीक पाटील हेदेखील सातत्‍याने विदयार्थी व शाळेच्‍या मदतीसाठी पुढाकार घेऊन स्‍वतः तसेच समाजातील व परिचयातील दानशुर व्‍यक्‍तींच्‍या माध्‍यमातून शाळेला आवश्‍यक साधन सामग्री व विदयार्थ्‍यांना स्‍कॉलरशीप देऊन आपली शाळेप्रती बांधिलकी दर्शवत असतात. खऱ्या अर्थाने गरीब, सामान्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरलेल्या या दोन्ही शाळांची शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील प्रगती सातत्याने यशोशिखरावरच राहिलेली आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात तालुका व जिल्हा स्तरावर सर्वांगाने परिपूर्ण व उत्तम शाळा म्हणून ह्या शाळा परिचित आहेत. शाळेच्या या दर्जेदार कामगीरीसाठी सर्वांगीण विकासासाठी दोन्ही शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थाचालकांची सुरू असलेली अविरत मेहनत काबिलेतारीफ आहे. त्यांचे पुनश्च अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त