शाळा सुरू, काळजी घ्या
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
कोरोनाची दोन वर्षे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती मंदावणारी ठरली. घरी बसून घेतलेले शिक्षण सर्वच मुलांना फलदायी ठरलेले नाही. अभ्यासक्रम, परीक्षा याबरोबरच मुलांच्या कला व क्रीडागुणांनाही ब्रेक लागल्याने हे नुकसान भरून न येणारे आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर यंदा शाळा प्रत्यक्षात सुरू करणे क्रमप्राप्तच होते. मात्र शाळा सुरू झाल्यानंतर आता शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी आणखी वाढली आहे. प्राथमिक शाळांमधील मुलांचे लसीकरण अद्याप न झाल्याने संसर्गाचा धोका हा सर्वाधिक याच गटात आहे. त्यात शालेय वर्गांमध्ये सामाजिक अंतर राखणे तसेच मुलांना स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देणे शाळांची जबाबदारी आहे. मुलांच्या शाळेपर्यंतच्या प्रवासात स्कुल बस व व्हॅनमध्ये गर्दी होऊ न देण्याची खबरदारी घ्यायला हवी. मुलांना शालेय अभ्यासक्रमासोबतच व्यक्तिगत स्वच्छता व संसर्गजन्य आजारांबाबत जागृत ठेवणे शिक्षकांची जबाबदारी आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांना त्याबाबत योग्य सूचना वेळोवेळी देऊन शाळेत पाठवणे आवश्यक आहे. मास्कचा वापर हा शाळेत विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी करायलाच हवा. शाळेतील वर्गनिहाय पटसंख्या व वर्गखोल्यांची क्षमता याचे गणित शाळांना जुळवावेच लागेल. वर्गात मुलांची दाटीवाटी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. एकंदरीत शाळा सध्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्याने कुठल्याही प्रकारचा संसर्ग पसरू न देण्याची जबाबदारी शाळा, शिक्षक व पालकांचीही आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment