मानवतेसाठी योग

राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत आरोग्य भवन येथे जागतिक योग दिन साजरा
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मंगळवार दिनांक २१ जून २०२२ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय आयुष अभियानामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन आरोग्य भवन, मुंबई येथे करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य सेवा आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक डॉ रामास्वामी एन., आरोग्य संचालिका डॉ साधना तायडे, वित्त संचालक श्री बिवलकर, सहसंचालक डॉ विजय कंदेवाड, डॉ पदमजा जोगेवार, श्री संजय सरवदे, डॉ एकनाथ माले, श्रीमती रेहाना काझी, डॉ विजय बाविस्कर, अधीक्षक अभियंता श्रीमती दिपाली भाईक, योगसाधक डॉ निरंजन पटेल, आयुष अभियानाचे सहाय्यक संचालक डॉ अविनाश भागवत आदी मान्यवर तसेच आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. जागतिक योग दिनाचे यंदाचे घोषवाक्य मानवतेसाठी योग (YOGA FOR HUMANITY) असे असून योगातून मानवतेचा संदेश दिला गेला आहे. आयुक्त डॉ रामास्वामी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आरोग्य सेवेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा देत प्रत्येकाच्या जीवनातील योगाचे महत्व विषद केले. सध्याच्या धकाधकीच्या व व्यस्त जीवनशैलीत अनेक संसर्गजन्य तसेच डायबेटीज, हायपरटेन्शन यासारख्या असंसर्गजन्य आजारांची लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगत योगसाधनेचा अवलंब करत त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच आपण अनेक वर्षांपासून नियमित योग करत असून सर्वांनी दिवसातील काही वेळ योग साधनेसाठी व्यतीत करण्याचा महत्वपूर्ण सल्ला उपस्थितांना दिला. याप्रसंगी कोविड साथपरिस्थितीत सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र प्रदान करून करण्यात आला. उदघाटन समारंभानंतर सुप्रसिद्ध योग साधक डॉ निरंजन पटेल यांचे योग आणि जीवनमान या विषयावर व्याख्यान झाले तसेच त्यानंतर त्यांनी उपस्थितांकडून योगाची प्रात्यक्षिकेदेखील करवून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत खुमासदार पद्धतीने डॉ प्रसाद भंडारी यांनी तर आभार प्रदर्शन आयुष राज्य कार्यक्रम व्यवस्थापक डॉ प्रशांत भोईर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय आयुष अभियान तसेच आरोग्य सेवा आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. 


वैभव पाटील

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त