अशा आंदोलनांनी नक्की काय साध्य होते?
- Get link
- X
- Other Apps
सरकारने एखादा धोरणात्मक निर्णय घेतला की त्याला विरोध करण्याचा नवा ट्रेंड समाजात पसरत चालला आहे. वास्तविक विरोध करणारे हे मूठभर हिंसक लोक सर्व जनतेला वेठीस धरतात व सरकारी मालमत्तेची प्रचंड नासधूस करतात. यात काही विरोधी गटातील नेते व समाजकंटकांचा समावेश मोठ्या प्रमाणावर असतो. तरुण मुलांची माथी भडकवायची, त्यांना निरनिराळी अमिषे दाखवायची व त्यांना आक्रमक आंदोलने करण्यास भाग पडायचे हे प्रकार देशातील लोकशाहीला मारक ठरत आहेत. एखाद्या गोष्टीला विरोध करण्याचे वैचारीक व संविधानिक मार्ग उपलब्ध असताना त्यापासून सोयीस्कर लांब राहून तोडफोडीचे आंदोलन करून इप्सित साधता येते हा विषारी गैरसमज वेगाने पसरत चालला आहे. यात सर्वसामान्य कार्यकर्ते, गरीब कुटुंबातील मुलांची आयुष्ये अक्षरशः उध्वस्त होत आहेत. अशा आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या मुलांची शैक्षणिक आयुष्ये व्यपगत होऊन करियर बर्बाद झाली आहेत. दाखल गुन्ह्यांमुळे त्यांना पासपोर्ट मिळत नसल्याने शिक्षण नोकरीसाठी परदेशी जाण्याच्या वाटा बंद झाल्या आहेत. अग्निपथ कायद्याच्या घातला गेलेला धुडगूस अविचारी व सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवल्याचे द्योतक आहे. देशरक्षणासाठी तरुणाईला पुढे आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रयत्नांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. इस्राईलसारख्या देशात घरोघरी देशभक्त निर्माण करण्यासाठी तेथील शासन पुढाकार घेते. तसा प्रयत्न आपल्या देशात होत असेल तर त्यात वावगे काय? त्याबाबतीत मतभेद, शंकाकुशंका असू शकतात. मात्र ते सोडवण्यासाठी चर्चा, लोकशाही पद्धतीच्या निषेधाचे अनेक मार्ग खुले असताना रेल्वे, वाहनांची प्रचंड मोडतोड करणारे खरेच देशभक्त आहेत का याचा विचार सुज्ञांनी करायला हवा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment