जॉय सामाजिक संस्थेच्या विविध पुरस्कारांचे वितरण
सन्मान सेवाव्रतींचा
जॉय ऑफ गिंव्हींग सामाजिक संस्थेच्या वतीने
आयोजित विविध राज्यस्तरीय स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा तसेच विविध क्षेत्रांत
कार्य करणा-या सामाजिक घटकांचा सन्मान सोहळा रविवार दिनांक ५ जून २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता मोठया उत्साहात पार पडला. दादर (पूर्व) येथील आरजू
सभागृहात आयोजित उपस्थितांच्या भरगच्च सोहळयात या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या
हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून विचारमंचावर मुंबईचे
माजी उपमहापौर व प्रसिध्द उदयोगपती बाबुभाई भवानजी, जेष्ठ प्राध्यापक राम
नेमाडे, शिक्षक संघटनेचे नेते जनार्दन जंगले, जेष्ठ समाजसेवक डॉ. महादेव
वांजळू उपस्थित होते.
जॉयच्या वतीने आयोजित वृत्तपत्रलेखन, कविता लेखन, मराठी हस्ताक्षर
स्पर्धा, निबंध स्पर्धा, राखी मेकिंग, ग्रिटींग कार्ड मेकिंग
या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांतील विजेत्यांना
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, पुस्तक, मेडल व तुळशीचे रोपटे देऊन
गौरविण्यात आले. स्पर्धांचे परिक्षक म्हणून शिवाजी कुलाल, योगिता हिरवे, फिलिप रोद्रिक्स, भाग्यश्री रावले, ऋता रानडे यांनी काम पाहिले.
यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणा-या समाजसेवक संजय जोशी, अजित भोगले, अजत वैदय यांचा तसेच नामदेव
समाज परिषद, पुणे तसेच आदर्श शाळा म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या
शाळा क्रमांक ४१, अडवली भुतावली व जिल्हा परिषद शाळा, काटी, जि. पालघर यांचादेखील गौरव
करण्यात आला. सेवाभावी वृत्तीने आरोग्यसेवेचे काम करणा-या डॉ. महादेव वाळंजू यांना
जॉयच्या वतीने जिवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिपप्रज्वलन व क्रांतिज्योती
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचा शुभारंभ झाल्यानंतर
टीडीएफसेच सचिव श्री कुलाल सरांनी सर्व पाहुण्यांची सविस्तर ओळख उपस्थितांना करुन
दिली ज्यात त्यांनी पाहुण्यांच्या आपापल्या क्षेत्रातील कार्याची तोंडओळख करुन
दिली. त्यानंतर जॉयचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना
केली. प्रा. राम नेमाडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व अनुभवी मनोगतात मराठी माणसाचे
उदयोग व्यवसायातील स्थान व वाटचालीवर अचूक बोट ठेवत उदयोगपती बाबुभाई भवानजी यांच्यासारख्या
नामांकित उदयोगपतींच्या यशाचे पैलूदेखील उलगडले. आधुनिक शिक्षणपध्दतीवरदेखील त्यांनी भाष्य करत शिक्षणक्षेत्रातील
अनेक अनुभव त्यांनी कथन केले. उदयोगपती बाबुभाई भवानजी यांनी आपल्या भाषणात जॉय सामाजिक
संस्थेच्या कामाचे कौतूक करत हिरवे दांपत्य करत असलेल्या कामाचे तोंड भरुन कौतूक
केले. तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीस त्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या. शिक्षक
नेते जनार्दन जंगले यांनीदेखील जॉय संस्थेचे सर्व सहकारी करत असलेल्या निस्वार्थी
सेवेचे कौतूक करत देण्यातील आनंद इतर कशातच नसल्याचे प्रतिपादन केले. जिवनगौरव पुरस्कार
प्राप्त श्री महादेव वाळंजू यांनी आपल्या भाषणात आपल्या आरोग्यक्षेत्रातील निरनिराळया
अनुभवांना उजाळा दिला.
कविता स्पर्धेत शुभदा पाटकर, गोविंद कुलकर्णी, रेखा पाटोळे, आरती साठे हया विजेत्या
ठरल्या. वृत्तपत्रलेखन स्पर्धेसाठी अनंत बोरसे, कमलाकर जाधव, सुनिल कुवरे, दिलीप पाटोळे, आदर्श पत्रकार मनोहर कुंभजकर
यांना सन्मानित करण्यात आले. राखी मेकींग स्पर्धेत मिनल कुडाळकर, मिनल आंबेरकर यांना तर
हस्ताक्षर स्पर्धेत प्रमोद महाडिक, बाळासाहेब कांबळे,भावना महाडिक, बी.एम. बाचल आदि विजेत्यांना
सन्मानित करण्यात आले. सुनिता माळवदे, छाया पाटील, सरला मोळदकर, वैशाली महाडिक, मधुबाला जंगले, सरला ठाकूर, रुपाली पाताडे, रश्मी पवार आदी महिलांना
नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डहाणू मोखाडा सारख्या भागात आदिवासी
महिलांसाठी कार्य करणा-या समाजसेविका उज्ज्वला डामसे यांनादेखील विशेष नारीशक्ती
पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. समाजसेविका उज्ज्वला डामसे, अडवली शाळेचे मुख्याध्यापक
भिकाजी सावंत आदी पुरस्कारार्थींनीदेखील यावेळी आपली मनोगते व्यक्त करत जॉयच्या
कार्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जॉयचे गणेश
हिरवे, योगिता हिरवे, अंसुता डिसोझा, वैभव मोहन पाटील, चंद्रशेखर सावंत, दत्ता रातवडकर, श्रीराम कानडे, सुधीर देशपांडे, भुषण मुळे यांनी विशेष
परिश्रम घेतले.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


Comments
Post a Comment