पावसाळापूर्व कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याची परिस्थिती मुंबईत नवी नाही. नालेसफाईचे कितीही दावे पालिकेच्या वतीने करण्यात आले तरी काही ठराविक ठिकाणी थोड्या पावसातदेखील दरवर्षी पाणी भरते. यामुळे वाहतूक व रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत असल्याने अशा ठिकाणी पालिकेची आपत्ती यंत्रणा सतर्क असायला हवी. सखल भाग, डोंगर पायथा, रेल्वे रूळ अशा ठिकाणी पाणी भरण्याच्या घटना नित्याच्याच झाल्यात. उपनगरीय लोकल सेवा व लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांचे मोठे जाळे असलेल्या मुंबई नगरीत पावसामुळे रेल्वे वाहतुकीस सातत्याने अडथळा येतो. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याचे काम महानगरपालिकेचे असताना वर्षानुवर्षे सुरू असलेली ही परिस्थिती अद्यापि सुधारु शकलेली नाही. मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण उडल्याच्या घटना अनेकदा घडलेल्या आहेत. यात महानगरपालिकेचे पितळ उघडे पडले आहे. पाणी वाहून नेणारे नाले, गटारे, नद्यांची स्वच्छता नियमित व व्यवस्थित केली तर ही परिस्थिती बदलू शकते. तसेच पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना गृहनिर्माण संस्थांना देखील दिल्यासदेखील परिस्थिती थोडी बदलेल. तसेच पावसाळापूर्व स्थितीचे अवलोकन करून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पालिकेने एखादी स्वतंत्र यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. एकंदरीत पावसाळ्यात मुंबईकरांचे होणारे हाल व नुकसान थोपवण्यासाठी महानगरपालिकेची भूमिका मोलाची असून त्या दृष्टीने काम होणे गरजेचे आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment