'प्रत्येकाने आयुष्यात किमान दोन झाडे तरी लावावीत'
आरसीएफ हरित चेंबूर प्रकल्पांतर्गत
यूथकौन्सिल नेरुळचा
वृक्षपूजन व वृक्षारोपन उपक्रम ....
'प्रत्येकाने आयुष्यात किमान दोन झाडे तरी लावावीत'
नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख) : विविध रस्ते, नागरी वसाहती, नवनवे प्रकल्प यामुळे सर्वात अधिक नुकसान झाले असेल ते झाडांचे; प्रगती, सोयी, सुविधा तर हव्या आहेतच. मग हे नुकसान भरुन काढायचे असेल तर प्रत्येकाने किमान दोन तरी झाडे लावून त्यांचे संगोपन करावे असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघ, नेरुळचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांनी नेरुळ येथे केले. आषाढी एकादशी निमित्त गजानन महाराज भक्त मंडळ, वाशी व यूथकौन्सिल नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने, आर.सी.एफ हरित चेंबूर प्रकल्पांतर्गत, नेरुळ येथील यूथकौन्सिल संस्थेच्या सावली रोपवाटिकेत आयोजित *वृक्षपूजन, वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून १० जुलै रोजी ते बोलत होते.*
**यूथकौन्सिलच्या कार्याचा गौरव करून, संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत, आषाढी एकादशी व झाडांचे महत्व विशद करुन ते पुढे म्हणाले की, आपण निसर्गाशी बांधील आहोत. म्हणून वृक्षारोपण करण महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने दोन झाडे लावली पाहिजेत कारण एक झाड दुसऱ्यासाठी लावायचे व एक झाड स्वतःसाठी कारण शेवटी जातांना देखील आपण याच झाडाच्या मदतीन जातो. त्यामुळे शेवटच्या क्षणासाठी लागणाऱ्या लाकडासाठी तरी आपण झाड लावलेच पाहिजे असे त्यांनी आवर्जुन सांगितले*.
यूथ कौन्सिल नेरुळच्या पुढाकाराने गेली सुमारे चौतीस वर्षे सातत्याने आषाढी एकादशी निमित्त नवी मुंबई आणि परिसरातील विविध गृहनिर्माण संस्था-वसाहती, टेकड्या, खाडीकिनारे, शैक्षणिक संस्थांची आवारे, हमरस्ते अशा ठिकाणी वृक्षारोपण, वृक्षवाटपाचे कार्यक्रम करण्याचा नेम ठेवला आहे. त्या अंतर्गत सुमारे ७५ हजारांहुन अधिक रोपटी या सर्व भागात लावून त्यांचे संवर्धन करण्यात संस्थेने योगदान दिले असून या कामी नवी मुंबई व नजिकच्या भागातील अन्य संस्था, कंपन्या, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, शालेय विद्यार्थी यांनीही वेळोवेळी मदतीचा हात देऊ केल्याचे याप्रसंगी केलेल्या प्रास्ताविकात यूथ कौन्सिल-नेरुळचे मुख्य सचिव सुभाष हांडे देशमुख यांनी सांगितले. यावेळी पंडित जीतेंद्र कुलकर्णी गुरुजी यांच्या मंत्रोच्चारांच्या उच्चारणानंतर वृक्षपूजनाचा मान अरविंद वाळवेकर यांना देण्यात आला व वृक्षारोपण करण्यात आले. अगदी शास्त्रशुद्ध पध्दतीने तुळशी पुजन झाले. एम फार्मा प्रथम वर्ष परिक्षेत मुंबई विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या नेरुळ येथील कु. ऐश्वर्या कुंचमवार हिचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नमुंमपा शाळेचे मुख्याध्यापक अशोक सोनावणे, तसेच रणजित दिक्षित, सुरेंद्र झापर्डे, सीमा आगवणे, सुचित्रा कुंचमवार, विकास साठे, प्रभाकर गुमास्ते, नंदलाल बैनर्जी, दिपक दिघे, प्रकाश लखापते, पी. आर. गुप्ता, दत्तात्रय म्हात्रे, नयन पवार, पत्रकार राजेंद्र घरत, रमेश सुर्वे, शिवाजी शिंदे, भालचंद्र माने, अशोक महाजन, दत्ताराम आंब्रे, रमेश शाहीर, नरेश विचारे, दिलीप चिंचोले, आदिकराव यादव, निशांत बनकर आदि उपस्थित होते
Comments
Post a Comment