भ्रष्टाचार दूर झाला तर रस्त्याची गुणवत्ता व दर्जाही सुधारेल

मुंबईत ठिकठिकाणी वर्षभर रस्त्यांची कामे केली जातात. त्यासाठी मोठमोठी कंत्राटे दिली जातात. मात्र पावसाळा सुरू झाला की या रस्त्यांवर खड्डे पडून त्या रस्त्यांची अक्षरशः चाळण होऊन जाते. खड्ड्यातून वाट काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने अंदाज न आल्याने अनेक अपघात होतात. वाहतूक कोंडी व इंधनाचा अपव्यय देखील ओघाने आलाच. या समस्येकडे गांभीर्याने पाहिले न गेल्याने वर्षानुवर्षे ही परिस्थिती बदलू शकलेली नाही. यात कंत्राटदार, लोकप्रतिनिधी व प्रशासनातील काही घटक सामील असल्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. वास्तविक मुंबईसारख्या आर्थिक राजधानीतील रस्ते पाच दहा वर्षांच्या देखभाल दुरुस्तीसाठी एखाद्या नामांकित कँपनीकडे देणे आवश्यक आहे. तसेच रस्त्यांवर ठिकठिकाणी ज्या ठेकेदाराने दुरुस्ती केली असेल त्याचे नाव, संपर्क, कामासाठी आलेला खर्च व कामाची मुदत नमूद केलेले फलक लावले गेले पाहिजेत जेणेकरून लोकांना त्या रस्त्याची डागडुजी कोण ठरतेय हे कळेल. रस्ते कामातील भ्रष्टाचार दूर झाला तरच रस्त्यांची गुणवत्ता व दर्जा सुधारेल. यासाठी पारदर्शक प्रशासन, प्रामाणिक कंत्राटदार व दक्ष नागरिक असणे अत्यावश्यक आहे. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त