डिजिटल व्यवहारांचे यश

गेल्या काही वर्षांमध्ये देशातील डिजिटल व्यवहारांचे प्रमाण बऱ्याच अंशी वाढले आहे. प्रधानमंत्री जनधन योजना व डिजिटल भारत अभियानाचा सकारात्मक परिणाम ऑनलाईन व्यवहारांवर झालेला आहे. जनधन योजनेंतर्गत कोट्यवधी नागरिक बँकिंग व्यवहारांच्या परिक्षेत्रात आले. ३१३ सरकारी योजनांमधून चालू वर्षी अब्जावधी रुपयांचा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात दिला गेला आहे. आज खुल्या बाजारपेठांमध्ये किरकोळ व घाऊक व्यापारी बहुतांशी डिजिटल पेमेंट प्रणाली वापरत आहेत. मोबाईलमधील विविध ऍप्लिकेशनच्या आधारे थेट पेमेंट करता येत असल्याने लोकांचीदेखील सुट्टे पैसे व नगदी व्यवहारांच्या जंजाळापासून सुटका झाली आहे. थेट खात्यातून खात्यात आर्थिक व्यवहार होत असल्याने देश खऱ्या अर्थाने डिजिटल अर्थक्रांतीकडे वाटचाल करत आहे याबाबत दुमत नाही. याला कारणीभूत सरकारी व आरबीआयचे डिजिटल धोरण मानता येईल. मात्र अद्यापही सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीसारख्या ठिकाणी रोखीने व्यवहार केले जात आहेत, त्याकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. डिजिटल व्यवहारांमधील नेटवर्क, सर्व्हर प्रॉब्लेम यासारख्या तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. तसेच अशा प्रकारच्या व्यवहारांमधील होणाऱ्या तक्रारींचे जलद व परिणामकारक निरसन करण्यावर भर दिला तर सर्वसमावेशक डिजिटल धोरण सर्वार्थाने सफल होईल यात शंका नाही. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त