डॉ कारभारी खरात आरोग्य सेवेतून सेवानिवृत्त

आरोग्य सेवा आयुक्तालयातील एक अभ्यासू व कार्यक्षम अधिकारी डॉ कारभारी खरात सर आज नियत वयोमानाने शासन सेवेतून सेवानिवृत्त झाले. आरोग्य सेवेत तब्बल ३२ वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावलेले खरात सर ग्रामीण व दुर्गम भागाशी नाळ जुळलेलं व्यक्तीमत्व आहे. जव्हार, मोखाडा सारख्या दुर्गम भागात सेवा बजावलेल्या खरात सरांनी रायगड, ठाणे, अहमदनगर या जिल्ह्यांमध्येही आरोग्य अधिकाऱ्याची भूमिका चोखपणे वठवली. त्यांचा मितभाषी व संयमी स्वभाव त्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांनाही भावायचा. यामुळे ते प्रशासकीयदृष्ट्या काहीसे डावे ठरत असले तरी जिथे सेवा बजावायचे तिथे कर्मचारी वर्गामध्ये प्रिय होऊन जायचे. राज्याच्या अनेक दुर्गम भागात सेवा बजावल्यानंतर त्यांनी साधारणतः दीड दोन वर्षांपूर्वी आरोग्य सेवा संचालनालयात सहाय्यक संचालक (मुख्यालय) म्हणूनही सेवा बजावली. त्यानंतर भिवंडी महानगरपालिकेसारख्या महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतही त्यांनी कोविड साथ काळात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून महत्वपूर्ण व परिणामकारक सेवा बजावली. साधारणतः तीन महिन्यांपूर्वीच पुन्हा आरोग्य सेवा मुख्यालयात परतत त्यांनी उपसंचालक (नर्सिंग) या पदाची जबाबदारी पार पडली व आज ते निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीने विभागातील एक कर्तृत्व व अनुभवसंप्पन्न अधिकाऱ्याची एक्झिट झाली आहे. माझे वास्तव्य असलेल्या पालघर, ठाणे व त्यानंतर मुंबई कार्यालयात सेवा बजावलेल्या डॉ खरात सरांचे सानिध्य व मार्गदर्शन मलाही सातत्याने लाभले. कार्यालयीन कामकाजात त्यांचा मृदुपणा, हजरजबाबीपणा, अभ्यासू व संयमी वृत्ती, वक्तशीरपणा व प्रामाणिकपणा मला विशेष भावला. त्यांच्या निवृत्तीने विभागातील आणखी एक खुर्ची आज खाली झालेली असली तरी त्यांनी सार्वजनिक आरोग्य सेवेत यापुढेही कुठल्या न कुठल्या माध्यमातून योगदान व अनूभवाचा फायदा करून घ्यावा असे मनोमन वाटते. आपले उर्वरित आयुष्य ते कौटुंबिक कबिल्यात व्यतीत करण्याची भावना व्यक्त करतात, आपल्या मुलींचे शिक्षण व आयुष्य स्थिरस्थावर करण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे ते सांगतात. आज सायंकाळी निरोप घेताना सवयीप्रमाणे त्यांना माझ्या 'आरोग्यमंथन' ची शिदोरी दिली व कायम संपर्कात राहण्याचा शब्द घेऊन निरोप दिला. डॉ खरात सरांचे उर्वरित आयुष्य आरोग्यदायी व समाधानी जावो याच यानिमित्ताने शुभेच्छा. 

वैभव

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त