निरोगी शरीरासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे

पावसाळा हा वातावरणातील गारव्यामुळे सुखावणारा असला तरी तो अनेक साथीचे आजारदेखील घेऊन येत असतो ही बाब ध्यानात ठेवली पाहिजे. त्यामुळे साथीच्या आजारापासून प्रत्येकाने स्वतःचे व कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी दक्ष असणे गरजेचे आहे. पावसाळ्यात मुख्यत्वे सर्दी, ताप, डोकेदुखी, डेंग्यू, हिवताप यासारखे जलजन्य आजार पसरत असतात. दूषित पाणी व वातावरणातील बदलांमुळे हे आजार डोके वर काढतात. त्यामुळे पावसात फिरताना तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत योग्य काळजी न घेतल्यास आपण या आजारांना बळी पडतो. पावसाळ्यात पाणी गाळून व उकळूनच प्यायला हवे. ओलसर कपडे व पावसाच्या पाण्यात भिजणे शक्यतो टाळले पाहिजेत. महत्वाचे म्हणजे वर उल्लेख केलेल्या आजारांची कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास तातडीने आवश्यक चाचण्या व उपचार करायला हवेत. पावसाळ्यात राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झालेल्या आहेत. साथपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सरकारने हाती घेतलेल्या आहेत. त्यामुळे आजारपणात सरकारी दवाखान्यांत औषधोपचार लाभदायी ठरेल. आज ग्रामीण व शहरी भागांत अनेक सरकारी दवाखाने व रुग्णालये लोकांच्या सेवेत अविरत दिवसरात्र कार्यरत असून या आरोग्य संस्थांमध्ये विविध सरकारी योजना व साथीच्या आजारांबद्दलची माहिती, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवर मोफत औषधोपचार उपलब्ध आहेत. त्याबद्दलची माहिती घ्यावी व त्यांचा लाभ घ्यावा. केंद्र व राज्य सरकारच्या सहयोगातून आज शासकीय आरोग्य संस्था कात टाकत असून तेथे साथीचे आजार व  असाध्य आजारांवर अखर्चीक उपचार होत आहेत. खाजगी रुग्णालयांत होणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया सरकारी रुग्णालयांतही करण्यात येत आहेत. त्यामुळे सामान्य, गरीब, गरजू रुग्णांनी या सुविधांचा लाभ घ्यावा. आजारपण हे मानसिक, शारीरिक व आर्थिक स्वास्थ्य हरवणारे असल्यामुळे निरोगी शरीरासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त