जेष्ठांच्या सवलती बंद करू नका
जेष्ठ नागरिक ही खरी अनुभवाची शिदोरी आहे. नव्या पिढीला अनुभवसंपन्न करण्यात जेष्ठांचा वाटा महत्वाचा आहे. वयाची साठी त्यांनी आपले प्रापंचिक, सामाजिक आयुष्य समृद्ध करण्यात घालवलेली असते. साठीनंतर अनेकांचे उत्पन्नाचे साधन संपुष्टात आल्याने व वयपरत्वे नवा उद्योग व्यवसाय, नोकरी करण्यास शारीरिक सक्षम नसल्याने त्यांना विविध सवलती शासनामार्फत देण्यात येतात. रेल्वेतिकीटमध्येही पन्नास टक्के सवलत मिळते. मात्र ती बंद करून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. रेल्वे प्रवास हा देशभर कुठेही फिरण्यासाठी सर्वमान्य, जलद व वक्तशीर प्रवास म्हणून ओळखला जातो. जेष्ठ नागरिक त्याचा वापर मुले, नातलग, आप्तेष्ट यांच्याकडे जाण्यास तसेच अनेकदा आपली प्रकृती जपण्यासाठीच्या उपचारासाठी फिरण्यास देखील करतात. तसेच अनेक जेष्ठ नागरिक निवृत्तीनंतर विविध ठिकाणी भ्रमंती करण्यासाठीदेखील रेल्वे मार्ग निवडतात. अशा वेळी तिकिटातील सवलतीतून त्यांना एक आर्थिक दिलासा असतो. त्यातून बचतीचे मार्ग त्यांच्यासाठी उपलब्ध असतात. एकीकडे महागाई दिवसेंदिवस वाढत असताना व त्याचा फटका समाजातील सर्वच घटकांना बसत असताना जेष्ठांच्या सवलती बंद करणे उचित नाही. त्यामुळे जेष्ठांच्या बाबतीतील हा अन्यायकारक निर्णय तातडीने मागे घेऊन रेल्वे प्रवासातील त्यांची सवलत पूर्ववत करावी असे वाटते.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment