उपजत व नैसर्गिक अभिनयाचा कलाकार

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या दर्जेदार अभिनयाने उल्लेखनीय भूमिका साकारणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांचे निधन मनाला चटका लावून गेले. टूरटूर, मोरुची मावशी, भटाला दिली ओसरी ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली होती. त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर अनेक नाटकांमधून भूमिका साकारल्या. रंगभूमीनंतर त्यांनी आपला मोर्चा टेलिव्हिजन आणि चित्रपटांकडेही वळवत आपल्या खुमासदार अभिनयाने चित्रपटांना वेगळा दर्जा प्राप्त करून दिला. त्यांनी नवरा माझा नवसाचा, चश्मे बहाद्दर, एक दोन तीन चार, लावू का लाथ, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं अशा अनेक चित्रपटांमधून प्रशांत दामले, सचिन पिळगावकर, जयवंत वाडकर अशा दिग्गज कलाकारांबरोबर भूमिका साकारल्या. मंगळवारी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 'दुसरी बाजू' हा पुर्नप्रसारीत कार्यक्रम पाहिला. त्यात विक्रम गोखले यांनी प्रदीप पटवर्धन यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या नृत्याच्या आवडीबद्दल सांगितलं होतं. गोविंदामधल्या नाचाची आठवणही सांगितली होती. त्यावेळी गोविंदा खूप उत्साहात व्हायचा. शोभायात्रा असायच्या. गोविंदामध्ये नाचणं ही एक गंमत होती. आजच्यासारखं यायचं आणि हंडी फोडून जायचं असा प्रकार नव्हता. आमच्या गोविंदामध्ये मी अगदी सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत नाचायचो अशी आठवण त्यांनी सांगून दाखवली. याच कार्यक्रमात प्रदीप पटवर्धन यांनी आपण कायम बसनं का फिरतो हेही सांगितलं होतं. बसमधून प्रवास करताना माणसं दिसतात, विविध कॅरेक्टर्स भेटतात असं त्यांनी म्हटलं होतं. टॅक्सीने सगळेच जण जातात. पण ते नेहमी बस आणि ट्रेननं फिरायचे. प्रशांत दामले, विजय चव्हाण आणि प्रदीप पटवर्धन यांनी 'मोरुच्या मावशी'चे जवळपास पाचशे प्रयोग एकत्र केले होते. मराठी सिनेसृष्टीतील सतत हसरा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना हसायला भाग पाडणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांनी नकारात्मक भूमीकादेखील तितक्याच ताकदीने साकारल्या. असा उपजत व नैसर्गिक अभिनयाचा कलाकार पुन्हा होणे नाही.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त