ओलीम्पिक खेळाडूंना पाठबळ मिळावे
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
भारतात ज्या प्रमाणात आयपीएलसारख्या क्रिकेट स्पर्धांना अवाजवी महत्व दिले जाते त्या प्रमाणात इतर खेळांना दिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. खेळाला प्रोत्साहन व आवश्यक सुविधा न मिळाल्याने खेळाडू मागे पडतात. यासाठी गेल्या कित्येक वर्षांमध्ये ऑलिम्पिक, राष्ट्रकुल सारख्या क्रीडा प्रकारांमध्ये भारताची कामगिरी समाधानकारक होऊ शकलेली नाही. मात्र आता अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावरून मिळणाऱ्या सोयी सुविधांचा विचार न करता आपला खेळ उंचावण्यासाठी जीवापाड मेहनत घेताना दिसतात. यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या २२व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली आहे. इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरातील अलेक्झांडर स्टेडियमवर २२वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा खेळवली गेली. यावर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ६१ पदके जिंकून पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. यामध्ये २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांचा समावेश आहे. टोकियो ऑलिंपिकमधील यशानंतर भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेतही आपल्या देशाचा गौरव वाढवला आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताने सात पदकांची कमाई केली होती. त्यामुळे साहजिकच राष्ट्रकुल स्पर्धेतदेखील खेळाडूंकडून सर्वांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. काही खेळाडू दुखापतीने स्पर्धेबाहेर गेलेले असताना इतर खेळाडूंनी त्याचे दडपण न घेता सर्वोत्तम खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला. खेळाडूंच्या याच जिद्दी खेळामुळे व उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताला पदक तालिकेमध्ये चौथे स्थान मिळवणे शक्य झाले. गुणवत्तेचा आणि कौशल्यांचा विचार केला तर भारतीय खेळाडूंनी कमालीची प्रगती केली आहे. त्यामुळे साहजिकच खेळाडूंचा आत्मविश्वासही वाढलेला दिसला. याच आत्मविश्वासासह हे खेळाडू आता ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत उतरतील. आगामी ऑलिम्पिक व राष्ट्रकुल स्पर्धांसाठी भारताच्या दृष्टीने हे चांगले संकेत असून खेळाडूंचे मनोबल उंचावणारेदेखील आहे. राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी येणाऱ्या काळात अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व दर्जेदार खेळाडू तयार होण्याची गरज असून त्यांना सरकारी पाठबळ मिळणेदेखील तितकेच गरजेचे आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment