वेग मर्यादा आणि लेनची शिस्त पाळा

मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. त्यांच्या मृत्यूबाबत अनेक शंकाकुशंका व्यक्त करण्यात येत असल्या तरी राज्यातील या महत्वाच्या महामार्गावर सातत्याने सुरू असलेली अपघातांची मालिका चिंताजनक अशीच आहे. मागील वर्ष - दीड वर्षांच्या काळात तब्बल ३०० अपघात या मार्गावर झाले व त्यात १२५ मृत्यू झाले ही आकडेवारी धक्कादायक आहे. या ठिकाणी घडणाऱ्या अपघतांनंतर अपघातग्रस्तांचे प्राण वाचवणाऱ्या उपाययोजना तर आवश्यक आहेतच मात्र अपघातांची कारणमीमांसा करून असे अपघात टाळण्यासाठीदेखील पावले उचलणे क्रमप्राप्त आहे. दुर्दैवाने ते न झाल्याने अपघातांची मालिका थांबत नाही. वाहनांचा वेग कमी करण्यासाठी बसवण्यात आलेल्या स्पीड गन्सची उपयुक्तता अनाकलनीय आहे. एक्सप्रेस वेवर लेनची शिस्त पाळली जात नसल्याचे प्रमुख कारण बहुतांश अपघातांना आहे. मधल्या लेनमध्ये हलकी वाहने, डाव्या बाजूला जड वाहने व उजव्या बाजूला ओव्हरटेक करणारी वाहने महामार्गावर धावणे अपेक्षित आहे. मात्र अनेकदा ट्रक, ट्रेलर, टेम्पो यासारखी जड वाहने मधल्या व उजव्या बाजूकडील लेनमध्ये दिसतात. यामुळे लेनची शिस्त पाळली जात नाही आणि ओव्हरटेक करताना गंभीर अपघात घडून नाहक जीव जातात. वाहनांची वेगमर्यादा आणि लेनची शिस्त पाळली गेल्यास बरेचसे अपघात टाळले जातील असे मत आहे. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त