समाज चुकीच्या दिशेने जातोय

सन २००२ मध्ये गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आल्यानंतर उसळलेल्या दंगलीत ५ महिन्यांच्या बिलकीस बानो या गर्भवती महिलेवर बलात्कार करून तिच्या ३ वर्षांच्या मुलीसह कुटुंबातील ७ जणांची हत्या करणाऱ्या आरोपींची सुटका होताना त्यांना मिठाई भरवून व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. या घटनेच्या सीबीआय चौकशीत ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. ११ आरोपींपैकी एका आरोपीने सर्वोच्च न्यायालयात शिक्षा माफ व्हावी यासाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने हा निर्णय गुजरात सरकारला घेण्यास सांगितले आणि सरकारने एक कमिटी स्थापन करून त्यांची शिक्षा माफ केली. स्त्री स्वातंत्र्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या देशात ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना अशा प्रकारे मोकाट सोडणे व त्यांच्या सुटकेचा आंनद व्यक्त करणाऱ्यांच्या आसुरी मानसिकतेची कीव करावीशी वाटते. न्यायाच्या प्रतीक्षेत लढा देत असलेल्या अत्याचारपीडित महिलांचे खच्चीकरण करणारी ही घटना आहे. महिलांवरील अत्याचारात गुन्हा सिद्ध झाल्यानंतर जातीय व्यवस्थेचा कुठलाही अडथळा त्यात नसायला हवा. अशा प्रकारचे निर्णय घेण्याआधी सामाजिक संवेदनशीलतेचा विचारदेखील होणे गरजेचे आहे. समाजात काहीतरी चुकीचे घडतेय याचे हे द्योतक आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त