मध्य रेल्वेवर अधिकच्या फेऱ्यांचे गणित कधी सुटणार?
- Get link
- X
- Other Apps
येत्या ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर नवीन वेळापत्रक लागू करण्याची आखणी सुरू असून मध्य रेल्वेच्या ‘सीएसएमटी’-कल्याण, कसारा, खोपोली आणि सीएसएमटी-पनवेल हार्बर, ट्रान्स हार्बरवर नवीन फेऱ्या वाढविणे अशक्य असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. ठाणे ते दिवा दरम्यान पाचवी, सहावी मार्गिका पूर्ण होताच विनावातानुकूलित लोकल फेऱ्यांमध्ये वाढ न करता फक्त वातानुकूलित फेऱ्यांमध्येच वाढ झाली. त्यामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळालाच नाही. त्यातच आधीच वाढलेल्या फेऱ्या, त्यामुळे उपनगरीय सेवांवर येणारा ताण, नवीन फेऱ्यांसाठी उपलब्ध नसलेली जागा, वेळेत उपलब्ध होऊ न शकलेल्या नवीन मार्गिका यासह अन्य कारणे ही नवीन फेऱ्या न वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. एक्सप्रेस गाडय़ांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध व्हावी आणि त्यामुळे जलद लोकलचे वेळापत्रकही सुधारावे यासाठी ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान पाचवी, सहावी मार्गिकेचे काम पूर्ण करण्यात आले. फेब्रुवारीमध्ये या मार्गिकेचे लोकार्पण झाले. यानंतर ३६ नवीन फेऱ्या सुरू केल्या. यामध्ये ३४ वातानुकूलित आणि दोन विनावातानुकूलित लोकल फेऱ्या होत्या. त्यानंतर वातानुकूलित लोकल फेऱ्यांचीच संख्या वाढत गेली. वातानुकूलित फेऱ्या वाढवण्यासाठी सामान्य लोकलच्याही फेऱ्या रद्द करण्यात आल्या. आता ऑक्टोबर २०२२ पासून लागू होणाऱ्या नवीन उपनगरीय वेळापत्रकातही सामान्य लोकल प्रवाशांना फारसा दिलासा नसेल. एकीकडे उपनगरांमध्ये भरमसाठ संख्येने वाढत चाललेली लोकसंख्या व त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे अपुरे पर्याय याची परिणीती रस्त्यावरील दर दिवशी वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीत होत आहे. काही मिनिटांच्या प्रवासासाठी तासंतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. अशा परिस्थितीत सर्वात विश्वासार्ह असलेली रेल्वे सेवा आपले विस्तारीकरण करण्यास तयार नाही ही बाब प्रवाशांच्या त्रासात भर घालणारी आहे. मध्य व हार्बर मार्गांवर जोवर नव्या मार्गिकेंची आखणी होत नाही तोवर फेऱ्यांची संख्या वाढणार नाही. त्यातच सर्वसामान्य प्रवाशांसाठी बिनकामाची ठरलेल्या वातानुकूलित लोकल सेवांची भाऊगर्दी रेल्वे रुळांवर होऊ लागली आहे. यामुळे लोकलगर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच यंदादेखील नव्या फेऱ्यांची कुठलीही वाढ करणे शक्य नसल्याने या दोन्ही मार्गावरील प्रवाशांची निराशाच झाली आहे. मुख्य मार्गावर सीएसएमटी पर्यंत एक्सप्रेससाठी स्वतंत्र मार्गिका तसेच हार्बरवर तिसरी व चौथी मार्गिका कार्यान्वित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment