स्वयंरोजगाराच्या वाटा खुल्या करणारे शिक्षण हवे

मुंबई महाराष्ट्रातील बहुतांश उद्योगधंदे अमराठी लोकांच्या अखत्यारीत आहेत ही बाब नाकारता येणार नाही. एकेकाळी मुंबईत बहुसंख्य समाज म्हणून ओळखला जाणारा मराठीजन आज अल्पसंख्यांक ठरतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पारंपरिक रहिवाशी संकुले, कोळीवाडे, गिरणी कामगार, खेड्यातून नोकरीसाठी स्थलांतरित झालेला वर्ग वगळता अमराठी नागरिकांचा भरणा मुंबईत अधिक आहे. त्यात महत्वाच्या बहुतेक व्यवसायांमध्येदेखील अमराठी लोकच अधिक आहेत. मिळेल ते व पडेल ते काम करण्याची तयारी, धंद्याची जिद्द व चिकाटी तसेच परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती ही कारणे यामागे देता येतील. मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये आज नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्थिरावलेला परप्रांतीय घटक मोठ्या संख्येने आहे. त्यात मराठी कुटुंबांची मानसिकता उद्योग व्यवसायापेक्षा नोकरी करण्याकडे अधिक प्रमाणात झुकत चाललेली आहे. शिक्षण, नोकरी व प्रपंच यात मराठी माणूस समाधानी दिसतो. हे चित्र परावर्तित करणे सदयस्थीतीत शक्य नसले तरी मराठी तरुणांना व्यवसायासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिल्यास ते व्यवसायाकडे आकर्षित होतील. यासाठी स्वयंरोजगाराच्या वाटा खुल्या करणारे शिक्षण, प्रशासनाकडून आर्थिक पाठबळ व आवश्यक प्रशिक्षण या बाबी महत्वाच्या ठरतील. शैक्षणिक कारकीर्दीपासून तरुणांना व्यवसायासाठी प्रोत्साहित केले तर उद्योगधंद्यामध्ये मराठी मुले दिसतील. जिद्द, चिकाटी व संघर्ष या बाबी व्यवसायामध्ये गरजेच्या असून त्या अंगिकारणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासनाने महाराष्ट्रातील तरुणांना व्यवसायात उतरण्यासाठी प्रोत्साहित करणारे ठोस धोरण अंमलात आणणे काळाची गरज आहे. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त