सुरक्षेचे नियम पाळायलाच हवेत

आज आपल्या समाजात प्रत्येकाला व्यक्ती व धर्मस्वातंत्र्य आहे. कुणी कुठला धर्म पाळावा व साजरा करावा यासाठी मर्यादा नाहीत. मात्र तो साजरा करत असताना स्वधर्मीय तसेच इतर धर्मियांना त्रास होता कामा नये हे पथ्य मात्र पाळायला हवे. सार्वजनिक उपक्रम, सण, कार्यक्रम साजरा करतेवेळी सुरक्षेचे नियम व कायदा पाळणे आवश्यकच आहे. यंदा गणेशोत्सव, गोपाळकाला हे महाराष्ट्रातील मोठे सण कुठल्याही निर्बंधाविना साजरे होत आहेत. कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर सणांवर निर्बंध नकोत अशी यामागील भूमिका असली तरी कोरोनाच्या अगोदरदेखील या सणांवर निर्बंध होतेच की! वास्तविक सार्वजनिक सण उत्सवादरम्यान समाजात घडणारे अपप्रकार व दुर्घटना टाळण्यासाठी लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक नियम व सक्ती असायलाच हवी. यासाठी अतिउत्साह व तरुणाईचा जोश वगैरे बाबी काही प्रमाणात थोपवायला हव्यात. दही हंडीसारख्या उत्सवात मनोरे रचताना गंभीर जखमी झालेल्या गोविंदांची व त्यांच्या कुटुंबियांची अवस्था काय होत असते हे आपण यापूर्वी अनेकदा पाहिले आहे. त्यामुळे सण उत्साहात साजरा करायला हवा याबाबत दुमत नाही मात्र त्यासाठी स्वतःची काळजी व इतरांचा विचारदेखील करायला हवा, नाही का !


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त