कौटुंबिक, भावनिक व सामाजिक ऋणानुबंधाचा वाढदिवस
असाही एक वाढदिवस - संस्मरणीय कार्यक्रम
मुलांचा वाढदिवस हा खरंतर आई वडिलांच्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण असतो. मुलांना सुखासमाधानात वाढवण्याचा, त्यांना आंनद देण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. याच प्रयत्नात वाढदिवसासारखा आनंदी क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. आणि त्यात मुलाचा पहिला वाढदिवस असेल हा आनंद द्विगुणीत झालेला असतो. कुणी हा क्षण आपल्या कुटुंबियांबरोबर, आप्तेष्टांबरोबर साजरा करतो तर कुणी मित्रमंडळी वा जवळच्या लोकांबरोबर. मीदेखील अशा अनेक कार्यक्रमांचा साक्षीदार राहिलेलो आहे. मात्र परवा एका अशाच लक्षात राहण्यासारख्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. लक्षात राहण्यासारखा एव्हढ्यासाठी की या कार्यक्रमातून अनेक गोष्टींचा बोध उपस्थितांना घेता आला. वसई येथील माझे साडू श्री जितेश जाधव यांचे बंधू श्री रंजित यांच्या क्रियांश या मुलाचा पहिला वाढदिवस गणेशपुरी येथील श्रद्धा फार्म येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. कुटुंबीय, आप्तेष्ट आणि मित्रमंडळींच्या भरगच्च गोतावळ्यात रंजित यांनी कार्यक्रमाचे नियोजन खूपच सुंदररित्या केले होते. पाहुणचारात कुठेही काही कमी नव्हती. मात्र त्यात भावण्यासारखी एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे याच फार्मच्या बाजूला असलेल्या सेकंड इनिंग हाऊस नावाच्या वृद्धाश्रमाच्या सानिध्यात हा वाढदिवस सोहळा आयोजिला होता. वास्तविक कार्यक्रमाचे हे ठिकाण भर पावसात मुंबई, वसईकडील मंडळींना गाठण्यासाठी नाही म्हटले तरी रात्रीच्या वेळेस जरा अडगळीचेच. मात्र याच ठिकाणी वृद्धाश्रमाच्या सानिध्यात वाढदिवस साजरा करण्याचा मनोदय खुद्द रंजित यांच्या तोंडुनच ऐकल्यावर उपस्थितांचा ताण व संभ्रम कुठच्या कुठे पळून गेला होता. या आश्रमातील सर्व वृद्ध मंडळींना वाढदिवसानिमित्ताने भोजनाचे खास निमंत्रण होते. रंजित यांचा हा निर्णय खरेतर सर्वांसाठीच आश्चर्याचा सुखद धक्का देणारा आणि हेवा वाटावा असाच होता. वाढदिवसाचा केक कापल्यानंतर त्यांनी उपस्थितांमधून माझ्यासह वैद्यकीय क्षेत्रात कोरोना कालखंडात सेवा बजावलेल्या इतर नातेवाइकांनादेखील स्टेजवर बोलावून आपल्या आईच्या हस्ते सन्मानित केले हा क्षण त्यांच्या उदारमतवादी व्यक्तिमत्वावर कळस चढवणारा होता. वास्तविक रंजित हे स्वतः एमएसईबीसारख्या थेट लोकसेवेच्या खात्यात नोकरी करत असून कोरोना काळात घरी न बसता लोकांची मदत करताना मी त्यांना पाहिलेय. ज्यावेळी कोरोनाबधितांना ग्रामस्थ, नातलग दुरावत होते अशा लोकांसाठी कशासाठीही, कधीही सदैव तत्पर असलेली व्यक्ती म्हणजे रंजित जाधव. त्या वेळेस अनेकदा त्यांचे मला फोन येत होते, त्यातून त्यांची रुग्णांप्रति तळमळ व मदत करण्याची वृत्ती प्रकर्षाने दिसून आली. सामाजिक बांधिलकीची जाण असणारे रंजित अनेक सामाजिक उपक्रमांचा भाग होत त्यात सक्रिय योगदान देताना दिसतात. या काळात आवर्जून मदत केल्याबद्दल त्यांनी व्यासपीठावरील व्यक्तींचा उल्लेख केला असला तरी त्यात त्यांचे स्वतःचे योगदान कदापि नाकारता येणार नाही. सन्मानाला प्रतिसाद देताना त्यांच्या ह्या सेवाभावी वृत्तीचा व तळमळीचा उल्लेख करत मी त्यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देत धन्यवादही दिले. रंजित यांनी मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घडवून आणलेला हा अनोखा मिलाप उपस्थित सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरला. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर दोन मुलांचा जीवापेक्षा अधिक लक्ष देऊन सांभाळ करणाऱ्या आईबद्दल त्यांना प्रचंड आदरभाव आहे. हे सांगताना मात्र त्यांचे डोळे पाणावले व ते भावूक झालेले सर्वांनी पाहिले. आईनेही अगदी आवर्जून माईक हातात घेत रंजित आणि जितेश सारखी मुले प्रत्येक आईवडिलांना मिळो अशी भावनिक साद परमेश्वराला घालत वातावरण अधिकच भावुक बनवले. सवयीप्रमाणे त्यांना माझी आरोग्यमंथन आणि भटकंती ही पुस्तके याप्रसंगी भेट दिली. एकंदरीत त्या दिवशी मी अनुभवलेला तो वाढदिवस सोहळा रंजित व त्यांच्या कुटुंबियांच्या उत्तम नियोजन कौशल्याने कौटुंबिक, सामाजिक, भावनिक अशा सर्वच पातळ्यांवर कौतुकास्पद ठरला एव्हढे नक्की. वैभव
Comments
Post a Comment