आवाजाच्या मर्यादा ओलांडल्या
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
कोरोनाच्या निर्बंधांनंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात सर्वत्र साजरा करण्यात आला. जल्लोष, उत्साह याचा अर्थ मोठया आवाजात डीजे, लाऊडस्पीकर असा अर्थ तरूणाईकडून लावला जातो. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी यंदा ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादा ओलांडल्या. त्यामुळेच ध्वनी प्रदूषणाने १८ वर्षांचा उच्चांक मोडल्याची नोंद आहे. आवाज फाउंडेशनच्या अहवालात अनेक ठिकाणी आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांडल्याची नोंद झाली आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे २ वर्षे गणेशोत्सव भाविकांच्या गर्दीशिवाय साजरा झाला. मात्र त्यात ध्वनिप्रदूषणाचा कहर झाला. २०१५ मध्ये १२३.७ डेसिबल आणि २०१३ मध्ये १२३.२ डेसिबल आवाजाची नोंद झाली होती. २००३ साली सर्वाधिक ध्वनी प्रदूषण झाले होते. त्यानंतर यावेळी रविवारी ५ दिवसांच्या गणपती विसर्जनात मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण झाले. ढोल-ताशा पथकाचे ढोल लोखंडी हातोड्याने वाजवले जातात. त्यातून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. हृदय विकार रुग्ण, गरोदर स्त्रिया, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांना मोठ्या आवाजाचा सर्वाधिक त्रास होतो.१२० डेसिबल आवाजाने कानाच्या पडद्याला गंभीर इजा पोहोचते. रक्तदाब आणि डोकेदुखी यांचा त्रास होतो. ध्वनी प्रदूषण कायद्यांतर्गत औद्योगिक, व्यावसायिक, निवासी आणि शांत ठिकाणे या चार वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रांसाठी ध्वनी मानके निश्चित केली आहेत. औद्योगिक क्षेत्रासाठी, दिवसा 75 डीबी (डेसीबल) आणि रात्री 70 डीबी आहे. व्यावसायिक क्षेत्रासाठी दिवसा 65 डीबी आणि रात्री 55 डीबी, निवासी क्षेत्रासाठी दिवसा 55 डीबी आणि रात्री 45 डीबी, सायलेन्स झोनसाठी दिवसा 50 डीबी आणि रात्री 40 डीबी मर्यादा आहे. सार्वजनिक उत्सव काळात यात थोडी शिथिलता देण्यात येत असली तरी मर्यादा पाळावीच लागते. दोन वर्षानंतर यंदा उत्सवांवरील निर्बंध हटवण्यात आल्याने लोकांनी मात्र आवाज मर्यादेलादेखील शिथिलता दिली आणि सार्वजनिक मंडळांचा उंच आवाजही स्वीकारला. त्यामुळे यासंदर्भातील तक्रारींचे प्रमाण नगण्य असले तरी आवाजावरील मर्यादेला फाटा नकोच असे मत आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment