देवमाणूस मालिकेचा शेवट

झी मराठीवरील 'देवमाणूस' ह्या बहुचर्चित मालिकेचा आणि चांगुलपणाचा बुरखा पांगरुन लोकांना फसवणाऱ्या व स्त्रियांचं शोषण करणाऱ्या देवीसिंगचा अखेर शेवट झाला. प्रेक्षकांमधील तीव्र प्रतिक्रियांनंतर ही मालिका अपेक्षेप्रमाणे आटोपती घ्यावी लागली आहे. सुरुवातीला सत्य घटनेवर बेतलेली मालिका म्हणून या मालिकेची चर्चा झाली. बोगस डॉक्टर आणि त्यानं केलेले खून असं या मालिकेचं कथासूत्र होतं. सत्य कथानकाप्रमाणे देवमाणूसच्या पहिल्या भागाचा शेवट होईल असा कयास पहिल्या सिझनमध्ये अनुत्तरीतच राहिला होता आणि मालिकेचे कथानक अक्षरशः भरकटले. टीआरपी वाढवण्याच्या नादात मालिकेत न पटणाऱ्या आणि दृष्ट प्रवृत्तीरोधात चीड आणणाऱ्या अनेक घटना दाखवण्यात आल्या. दुसऱ्या पर्वात तर ह्या बोगस डॉक्टरनं नटवर हे अनाकलनीय सोंग धारण केलं आणि एका छोट्या गावात पुन्हा एकदा निष्पाप लोकांच्या हत्यांचे सत्र सुरू केले. हा खरेतर दर्शकांच्या सहनशीलतेचा कडेलोट होता. मालिकेतील कलाकारांचा अभिनय दर्जेदार असला तरी त्याचे कथानक रोष वाढवणारे ठरले. अशा बोगस व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला संपवण्यासाठीची वाढत असलेली प्रतीक्षा मालिकेच्या व वहिनीच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी होती. त्यामुळे अखेर या देवीसिंगरूपी नराधमाला फासावर लटकवल्याने गावकऱ्यांनी आणि प्रेक्षकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. दर्शकांच्या भावनांशी खेळणाऱ्या व दक्ष नागरिक, पोलिसांचे हनन करणाऱ्या अशा मालिका यापुढे प्रदर्शित न करणेच योग्य ठरेल. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त