मुंबईत मराठी माणूस टिकायला हवा
- Get link
- X
- Other Apps
पैठणच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत असल्याबाबत भाष्य केले. वास्ताविक मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. येथील कोळी, कोकणी, गिरणी कामगार ही मुंबईची पारंपरिक व मराठमोळी ओळख आहे. मात्र मुंबईतील मराठी टक्का कमी झाला आहे हे वास्तव नाकारून चालणार नाही. याबाबत सातत्याने विविध माध्यमांद्वारे वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्यात येत आहे. मुळात मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला जाण्याची अनेक कारणे आहेत. स्थानिक प्रशासन म्हणून महानगरपालिकेची धोरणे याला नक्कीच जबाबदार आहेत. मुंबईतील छोट्यामोठ्या उद्योग व्यवसायांमध्ये मराठी व्यक्ती स्थिरावू शकलेला नाही. उलट परप्रांतीय व्यावसायिक इथे मोठ्या संख्येने फोफावले. पर्यटन विकासाच्या दृष्टीने देखील मुंबईत मराठीजणांना कुठेही स्थान मिळाले नाही. मुंबईतील सर्वात मोठे जाळे आलेली टॅक्सी वाहतूकही बऱ्याच अंशी परप्रांतीयांच्या ताब्यात आहे. मुंबईतील घरांच्या किमती व देखभाल दुरुस्ती खर्च आवाक्याबाहेरचा ठरू लागल्याने हळूहळू मुंबईकर उपनगरांकडे सरकू लागलेला आहे. बॉलिवूडचे आश्रयस्थान ठरलेल्या मुंबईत अमराठी कलाकारांचे वर्चस्वही अधिक आहे. एकीकडे मुंबई दिवसेंदिवस विकसित होत असताना मराठी टक्का मात्र घसरत चालला आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईवरील मराठी पकड हळूहळू ढिली होत आहे. महाराष्ट्राचे राजकीय, सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्राचे सर्वात मोठे केंद्र असलेल्या मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे व त्यासाठी राज्य सरकार व महानगरपालिका यांची भूमिका आगामी काळात अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment