पुस्तक भेट.. उत्तम भेट
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
आज हातोहाती आलेल्या मोबाईलवर क्षणार्धात सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होत असल्यामुळे वाचन संस्कृती लुप्त होत चालली आहे. पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे अनेक प्रकाशन संस्था, वृत्तपत्रे अखेरच्या घटका मोजत आहेत. किंबहुना अनेक छोटी मोठी, स्थानिक वृत्तपत्रे बंद होत आहेत. ज्या पद्धतीने फोर जी, फाय जी तंत्रज्ञान पुढे आणले जात आहे, अँड्रॉइड, आय फोन यासारखे संगणकीय प्रतिभा धारण केलेले मोबाईल तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे त्या पद्धतीने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत हे अत्यंत खेदजनक वाटते. मोजके साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत, संपादक मुद्रित साहित्यासाठी आग्रही दिसून येतात. साहित्य संमेलने केवळ नावाला भरवली जात आहेत. तेथील पुस्तक विक्री व साहित्य कला अवगत करण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही रोडावत चालली आहे. वाचन व लेखन ही मानव विकासाच्या प्रथम टप्प्यातील साधने आहेत. त्यामुळे त्यांची जोपासना व परंपरा टिकवलीच पाहिजे. अन्यथा भावी पिढी अज्ञानाच्या वाटेवर जाण्यास वेळ लागणार नाही. वाचनाविषयी इतका आग्रह इथे धरण्याचे कारण हेच की प्रत्येकाने आपल्या दिवसातील काही वेळ वाचनासाठी द्यायलाच हवा. वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी मीदेखील गेल्या काही वर्षांपासून काही न काही निमित्ताने मित्रमंडळी, आप्तेष्ट, स्वकीय, सहकारी, ओळखीतल्या व जवळच्या लोकांना पुस्तके भेट देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. कुणाचे लग्न असो, वाढदिवस असो, सेवानिवृत्ती असो, घरात एखादे मंगल कार्य असो किंवा सहज घडून आलेली भेट असो दरवेळी नवनव्या व्यक्तींना पुस्तक आवर्जून भेट देतो. आजवर मी जवळपास दीड हजार पुस्तके विविध निमित्ताने भेट स्वरूपात प्रदान केलेली आहेत. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळानंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मी देखील अनेक आप्तेष्टांच्या घरी सहकुटुंब गणेश दर्शनाच्या निमित्ताने भेटी दिल्या आणि प्रत्येक ठिकाणी श्री गणेशाच्या साक्षीने यजमानांना पुस्तक आवर्जून भेट दिले. यात माझी स्वलिखित आरोग्यमंथन व भटकंती या तसेच महापूरूषांच्या चरित्रपर पुस्तकांचा समावेश होता. पुस्तकभेटीने घेणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर देखिल एक अनोख्या भेटीचा आनंद दरवळत होता. वास्तवीक श्री गणेश चरणी हार, फुले, गोड पदार्थ याऐवजी पुस्तक भेट खऱ्या अर्थाने मौल्यवान व ज्ञानवृद्धी करणारी ठरेल. अशा मंगल प्रसंगी पुस्तकाशिवाय इतर कोणतीही भेट समरुप व मौलिक असूच शकत नाही असे माझे ठाम मत आहे. पुस्तक भेटीने वाचन संस्कृतीच्या प्रसाराचे समाधान मिळतेच पण इतरांच्या ज्ञानात भर घातल्याची तृप्तीही मिळते. त्यामुळे पुस्तके भेट देण्याचा मी सुरू केलेला उपक्रम अधिकाधिक काळ जोपासण्याचा माझा मानस आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment