श्री बालाजी दर्शन

मित्रमंडळींसह तिरुपती श्री बालाजी दर्शनाचा योग
देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती येथील श्री बालाजी दर्शनाला जाण्याचा योग यंदा आला. मित्रमंडळींसह दरवर्षी दर्शनाला जाण्याचा प्रघात मागील दोन वर्षे कोरोनामुळे थांबला होता. यंदा घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर सुधीर, हरिकेश, कन्हय्या, प्रफुल्ल या मित्रांसह श्री बालाजी दर्शनाला जाण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार  २३ सप्टेंबरच्या चेन्नई एक्सप्रेसने २४ तारखेला तिरुपती जवळील रेणूगुंटा रेल्वे स्टेशनला दुपारी २च्या दरम्यान उतरलो. त्यानंतर तिरुपती परिवहन सेवेच्या बसने तिरुमाला येथे साडेतीन वाजता पोहोचलो. रेणूगुंटा ते तिरुपती हे अंतर १० किमी तर तिरुपती ते तिरुमाला देवस्थान हे निसर्गरम्य व डोंगरमाथ्यांचे अंतर २२ किमी आहे. तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास मात्र कमालीचा सुखावणारा व निसर्गसौंदर्याचा आस्वाद देणारा आहे. तिरुमाला येथे पोहोचल्यावर नारायणगिरी येथे आम्ही रूम बुक केली व त्यानंतर जेवण केले. थोडा विश्राम केल्यावर संध्याकाळी आम्ही दर्शनासाठी निघालो. अगोदरच काढलेल्या दर्शन पास मुळे साधारणतः दोन तासात रात्री दहा वाजेपर्यंत आमचे व्यवस्थितपणे श्री बालाजीचे दर्शन झाले. त्यानंतर बाहेर पडल्यावर स्थानिक बाजारपेठेत थोडी भटकंती करून अन्नपूर्णा रेस्टॉरंटमध्ये रात्रीचे जेवण उरकून नारायणगिरीत शनिवारचा मुक्काम केला. सकाळी उठून तिरुपती शहरातील इस्कॉन मंदिर, कपिलेश्वर मंदिर, पद्मावती मंदिर, बालाजी मंदिर या ठिकाणी दर्शन केले आणि श्री कलाहस्तीकडे निघालो. यासाठी तिरुमाला येथूनच आम्ही खाजगी वाहन भाड्याने घेतले होते. वाटेत एका हॉटेल वर जेवण करून साडेचार च्या सुमारास श्री कलाहस्ती येथील प्रसिद्ध शिवमंदिरी पोहोचलो. त्यावेळेस सुरू असलेली राहू केतूची तासभर करण्यात येत असलेली पूजा करुन श्री कलाहस्तीचे दर्शन घेतले. हे मंदिरदेखील अत्यंत सुंदर, सुबक, एतिहासिक, मनमोहक व कोरीव बांधकामाचे आहे. आठच्या सुमारास आमचे दर्शन आटोपल्यावर साडेदहाची मुंबई एक्सप्रेस पकडण्यासाठी रेणूगुंटाच्या दिशेने निघालो. श्रीकलाहस्ती ते रेणूगुंटा अंतर ३० किमीचे असून साडेनऊच्या सुमारास रेणूगुंटा येथे पोहोचल्यावर तेथील 'सांगलीचे पाटील' या हॉटेलमध्ये जेवण करून मुंबईसाठी परतीची गाडी पकडली. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्री बालाजीचे दर्शन सुरळीतपणे पार पडल्याचा आनंद आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता.  
वैभव मोहन पाटील घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त