वित्त व लेखा संचालक श्री चंद्रशेखर बिवलकर सेवानिवृत्त

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील वित्त व लेखा विभागाचे संचालक श्री चंद्रशेखर बाळकृष्ण बिवलकर हे आज शासकीय सेवेचा निरोप घेत सेवानिवृत्त झाले. शासनाच्या विविध विभागांमधील प्रदीर्घ सेवेनंतर आज आरोग्य विभागात त्यांची निवृत्ती झाली. आरोग्य विभागात येण्यापूर्वी ते सिडको प्रशासनात नवी मुंबई येथे कार्यरत होते. गेल्या दीड वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील वित्त व लेखाविषयक बाबी सांभाळताना अत्यंत प्रामाणिक, पारदर्शक, निष्कलंक, परिणामकारक व संयमी सेवा त्यांनी दिली. अत्यंत शांत व मितभाषी समजल्या जाणाऱ्या बिवलकर सरांनी त्यांच्या कारकिर्दीत त्यांना मिळालेल्या जबाबदारीला पूर्ण न्याय दिला. वित्त विभागासारख्या महत्वपूर्ण व संवेदनशील खात्यात काम करताना त्यांची दूरदृष्टी, विषयाचा सखोल अभ्यास व अचूकता वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे विभागाला त्यांच्या कामगिरीचा व योगदानाचा नक्कीच दूरगामी उपयोग होईल असे वाटते. विभागाच्या बैठकांमधील त्यांची संयमी भूमिका व योगदान कदापि विसरता येणार नाही. अभियानातील शासनस्तरावर अनेक रेंगाळलेल्या बाबी त्यांनी मार्गी लावल्या तसेच केंद्र शासनातील अधिकाऱ्यांशीही उत्तम समन्वय ठेवला. त्यामुळेच बिवलकर सरांसारखे अधिकारी कायम लक्षात राहतात. आज त्यांच्या दालनातील छोटेखानी निरोप समारंभात त्यांना सवयीप्रमाणे माझ्या 'आरोग्य मंथन' ची शिदोरी संग्रही दिली. बिवलकर सरांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.


वैभव

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त