गुरुजींच्या सेवानिवृत्तीनिमित्त विद्यार्थ्याचे पत्र

आदरणीय श्री गुरुनाथ पष्टे सर,
सन १९८९-९४ या कालावधीत देवघर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असताना आपला विद्यार्थी होण्याचा बहुमान प्राप्त झाला. आपण दिलेल्या शिकवणुकीवरच शैक्षणिक पाया घडला आणि आयुष्य जगण्याच्या धडपडीतून आजची जी काही वाटचाल सुरू आहे ती याच पायावर उभी आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून २५ वर्षे उलटली तरी आपला व फराड गुरुजींचा तो वर्ग आजही तसाच आठवतो. आपली ती लाकडी फूटपट्टी त्यावेळी जर हातावर पडली नसती तर आज जीवनाची दिशा काही निराळीच असती. अभ्यासाबरोबरच भविष्याचा वेध घेत आपण करिअर घडवण्यासाठी शालेय जीवनात दिलेले मोटीवेशन कदापि विसरता येणार नाही. अनेकविध उदाहरणे देत जीवनात नेहमी कुणालातरी आदर्श ठेवून वाटचाल करण्याचा सल्ला आपण सातत्याने दिलात. अंकाची ओळख आणि गणिताचे पाढे जीवनात किती उपयोगी पडतात हे त्यावेळेस आपण लक्षात आणून दिलेले गणित आज तंतोतंत पटतंय. मुलीचे पाढेपाठांतर घेताना होत असलेली दमछाक विद्यार्थ्यांसाठी आपण त्यावेळी घेतलेल्या कष्टाची जाणीव करून देते. शाळा व विद्यार्थी घडवताना आपण अत्यंत प्रामाणिकपणे, जिद्दीने, दूरदृष्टीने व तळमळीने करत आलेले प्रयत्न अलीकडे आपल्या केंद्रप्रमुख पदाच्या कारकीर्दीतही दिसून आले. आपल्या कार्यक्षेत्रातील काटी या दुर्गम गावातील छोटीशी शाळादेखील आयएसओ नामांकित व्हावी यासाठी सुरू असलेली आपली धडपड, २५ वर्षांपूर्वी देवघर शाळेतील मुलांच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या धडपडीपेक्षा तसूभरही कमी नव्हती. आपण पाहिलेली स्वप्ने आज ना उद्या पूर्ण होतीलच पण आपला विद्यार्थी असल्याचा अभिमान आपल्या निर्हेतुक उद्दिष्टांमुळे आणखीच दुणावला आहे. शासकीय सहयोगाविना समाजस्तरातून मदत मिळवत ग्रामीण शाळांना उच्च गुणवत्तेचा दर्जा प्राप्त करून देण्याचे स्वप्न बाळगणारा आपल्यासारखा गुरू आम्हाला व पर्यायाने वाड्याला लाभला हे एक भाग्यच. आपले अवघे आयुष्य शैक्षणिक क्षेत्राला वाहून घेणारे आपल्यासारखे शिक्षक दुर्मिळच. शिक्षण क्षेत्रातील आपण एक दीपस्तंभ आहात जो येणाऱ्या पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. निवृत्तीच्या काळातही आपली प्रकृती व उत्साह तरुणाईला लाजवेल असाच आहे. तालुक्यातील व जिल्ह्यातील तमाम तरुण शिक्षकांना आपली कारकीर्द हा एक पुस्तकीय धडाच आहे. शासकीय सेवेत असूनही एका मर्यादेपलीकडे जाऊन आपण आपल्याला मिळालेल्या जबाबदारीला केवळ न्यायच नाही पदाला प्रतिष्ठा प्राप्त करून देत आदर्शवत बनवण्याचा प्रयत्न केला. नोकरी आपण निव्वळ उदरनिर्वाहासाठी न करता ज्ञानदानाच्या ह्या पवित्र कार्यात अक्षरशः झोकून देऊन काम केले. आपले योगदान, हे क्षेत्र कधीही नाकारू शकत नाही. सहकारी शिक्षकांविषयी आपली आपुलकी, प्रेम, मैत्री, सदैव मदतीची भावना गोविंद पाटील सर, कमळाकर पाटील सर, जाधव सर यांसारख्या आपल्या काही सहकाऱ्यांच्या संदेशांतून वाचायला मिळाल्या व ऊर भरून आला. वाड्यासारख्या ग्रामीण भागात अत्यंत खडतरतेने, तन, मन व धनाने प्रामाणिक ज्ञानदानाची सेवा बजावत असताना कौटुंबिक जबाबदाऱ्याही आपण यशस्वीपणे पेलल्या हे पाहून आपल्याविषयीचा आदर आणखी बळावला. वैद्यकीय क्षेत्रात ENT व OPTH मध्ये एम.एस. पदवी मिळवलेल्या आपल्या कन्येच्या उच्च शिक्षणासाठी आपण घेतलेल्या कष्टाचे चीज आपल्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आले. आपण घडवलेले अनेक विद्यार्थी आज उच्च शिक्षण घेऊन निरनिराळ्या क्षेत्रांत स्थिरावलेत, आपण प्रतिनिधित्व केलेल्या शाळा आज विकासाची कात टाकताहेत हे आपल्या शैक्षणिक कारकिर्दीचे यश आहे. आज सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आपला एक विद्यार्थी म्हणून व्यक्त व्हावेसे वाटले म्हणून हा लेखप्रपंच. त्यात काही चुकीचे असल्यास तसेच सेवानिवृत्ती समारंभाला इच्छा असूनही उपस्थित राहता येत नसल्याबद्दल क्षमस्व. आपले उर्वरित आयुष्य निरोगी, समाधानी, कुटुंबकबिल्यात व शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शकाची भूमिका बजावण्यात व्यतीत होवो याच शुभेच्छा या निमित्ताने देतो. 

II प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपः II 

आपला विद्यार्थी 
वैभव 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त