भटक्या कुत्र्यांना आवरा

भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस फोफावताना दिसत आहे. दररोज कुठे ना कुठे या कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी होत आहेत. महानगरपालिकांमार्फत भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजिकरणाची प्रक्रिया राबवण्यात येते. मात्र असे निर्बिजिकरण केलेल्या कुत्र्यांची आकडेवारीच्या पारदर्शकतेबाबत शंका आहे. एकट्या मुंबईत भटक्या कुत्र्यांची अधिकृत संख्या आज तीन लाखांच्या घरात आहे. आठ वर्षांपूर्वी हीच संख्या लाखाच्या आत म्हणजे ९५ हजार होती. सन २०२० व २०२१ या  दोन वर्षांत निर्बिजिकरण केलेल्या कुत्र्यांची संख्या ३३ हजार इतकी आहे. एक मादी चार पिलांना जन्म देत असल्याने दिवसेंदिवस ह्या कुत्र्यांची संख्या वाढती असून निर्बिजिकरण अत्यावश्यकच ठरते. मात्र भटक्या कुत्र्यांची रस्त्यावरील संख्या कमी करण्यासाठी दुर्दैवाने प्रयत्न होताना दिसत नाहीत. जखमी कुत्र्यांना पशु रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते मात्र बरे झाल्यावर जिथून घेऊन जाण्यात आले तिथेच सोडण्यात येते. अशाने भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होणार तरी कशी? राजरोसपणे रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे, जोरजोरात भुंकणे, चावा घेणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. लहान मुले, वृद्ध, महिलांना याचा सर्वाधिक त्रास होतो. काही प्राणीमित्र संघटना व रस्त्यावरील कुत्र्यांना भूतदयेतून खायला घालणाऱ्या व्यक्तींकडून कारवाईला विरोध होतो. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने जर भटक्या कुत्र्याने एखाद्या व्यक्तीला चावा घेतला तर रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालणाऱ्याला जबाबदार धरले जाईल असा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय देताना पाळीव प्राण्यांचे हक्क आणि मानवाच्या सुरक्षेचा विचार करणे गरजेचे आहे असं स्पष्टीकरण न्यायालयाने दिलं आहे. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावर तोडगा काढण्यासाठी न्यायालयाने भर दिला असून भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यास सदर रूग्णाच्या उपचाराचा खर्चही भटक्या कुत्र्यांना खायला देणाऱ्यांनी उचलावा असं न्यायालयाने म्हटलं आहे. केरळातून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान कोर्टाने हा निर्णय दिला आहे. ऑगस्टमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये आठ लोकांचा मृत्यू झाल्याचे केरळ सरकारने न्यायालयात सांगितले. त्यामध्ये शाळकरी मुले आणि महिलांचा सामावेश होता. या घटनेवरून भटक्या कुत्र्यांची ही समस्या किती दाहक व सर्वव्यापी आहे हे लक्षात येईल. महाराष्ट्रात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे यांसह सर्वच महानगरांमध्ये ह्या मोकाट कुत्र्यांची समस्या उग्र रूप धारण करत असून त्यापासून नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी वेळीच ठोस उपाययोजना आखण्याची गरज आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त