रस्ते अपघात रोखायला हवेत

राज्यात अपघाती मृत्यूंची संख्या वाढती आहे. याला जबाबदार रस्त्यांची दुरावस्था आहे. मुंबईकडून गुजरात, नाशिक, कोकणात जाणारे सर्वच प्रमुख महामार्ग आज खड्डयांनी व्यापलेले दिसतात. खराब रस्ते व त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे दररोज अनेक निष्पाप जीव नाहक जात आहेत तर अनेकजण जखमी होत आहेत. वेळेचे व वाहनांचे होणारे नुकसान तर गिणतीतच नाही. रस्ते अपघातात पडणाऱ्या बळींची संख्या चिंताजनक आहे. मात्र याकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातो. वर्षांनुवर्षे खड्डेयुक्त रस्त्यांची समस्या सोडवण्याकडे सर्वच घटकांची उदासीनता दिसून येते. याला कारणीभूत रस्ते बांधणी व दुरुस्तीत मूरत असलेली टक्केवारी आहे. प्रशासनापासून लोकप्रतिनिधीपर्यंत सर्वच या साखळीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभागी असल्याने रस्त्यांच्या गुणवत्तेकडे सोयीस्कर कानाडोळा केला जातो. रस्ते दुरुस्तीची कामे वर्षानुवर्षे केली जातात मात्र रस्ते टिकत नाहीत ही समस्या सातत्याने व सर्वत्रच भेडसावते. अनेक आंदोलने करूनही रस्त्यांची कामे केली जात नाहीत अशी ओरड सातत्याने केली जाते. मात्र झोपलेल्यांना जागे केले जाते झोपेचे सोंग घेतलेल्यांना नाही अशी परिस्थिती आहे. निकृष्ट कामे, अवजड वाहनांची वाहतूक ही प्रमुख कारणे रस्त्यांच्या दुरावस्थेमागे आहेत. कामांचा दर्जा राखण्यासाठी रस्त्यांचे त्रयस्थ संस्थेकडून परीक्षण करून घेणे हितावह ठरेल. रस्त्यांच्या कामांवर नागरिकांनीदेखील बारकाईने लक्ष ठेवून निकृष्ट काम आढळल्यास संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार करावी. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरदेखील लोकांना चांगले रस्ते मिळणार नसतील तर यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय! 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त