उड्डाणपुलांखालील जागेचे सौंदर्यीकरण करा

आज जागोजागी उड्डाणपुलांचा सुकाळ झाल्याचे पाहायला मिळते. मोठमोठया महानगरांमध्ये ठिकठिकाणी मोक्याच्या जागांवर हे उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. मात्र या उड्डाणपुलांखालील मोकळ्या जागा जर आपण पाहिल्या तर त्या अस्वच्छ, घाणीचे साम्राज्य असलेल्या, अतिक्रमित आणि गर्दुल्ल्यांचा अड्डा बनल्याचे पाहायला मिळते. अनेक ठिकाणी अशा जागांचा वापर अनैतिक कृत्ये करण्यासाठी, जुगार खेळण्यासाठी व मद्यपान करण्यासाठी केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे उड्डाणपुलांखालील या मोक्याच्या जागांच्या वापराबाबत ठोस धोरण स्वीकारण्याची आवश्यकता आहे. विविध सामाजिक संस्था, स्वयंसहायता गट, बचत गट, पार्किंग यांसाठी नाममात्र दरात वापरण्यासाठी देण्याबाबत विचार करायला हरकत नाही. यामुळे या जागेची देखभाल दुरुस्ती, स्वच्छता अबाधित राहील व त्यावर अतिक्रमणदेखील होणार नाही. जिथे हे शक्य नाही तिथे अशा जागांवर फुलझाडांची लागवड करून उद्याने विकसित करता येतील. एकंदरीत उड्डाणपुलांखालील जागांची सुरक्षितता, स्वच्छता व सौंदर्य राखण्यासाठी संबंधित यंत्रणा व महानगरपालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे.  

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त