डॉ पदमजा जोगेवार यांची आरोग्य सेवेतून स्वेच्छानिवृत्ती
काल आणखी एका कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याने आरोग्य सेवेतून एक्झिट घेतली. गेल्या दोन-तीन वर्षांपासून राज्यस्तरावर आरोग्य सेवा आयुक्तालयात सहसंचालक पदावर कार्यरत असलेल्या डॉ पद्मजा जोगेवर यांनी सेवानिवृत्तीला दीडेक वर्ष बाकी असताना स्वेच्छानिवृत्ती स्वीकारत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. प्रकृतीच्या व कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी स्वेच्छेने निवृत्ती स्वीकारली असली तरी एक प्रामाणिक, कर्तव्य तत्पर, अभ्यासू व हजरजबाबी अधिकारी विभागाने गमावल्याची खंत नक्कीच आहे. १९९४ साली आरोग्य सेवेत रुजू झालेल्या डॉ जोगेवार यांची बहुतांश सेवा विदर्भातील भंडारा जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणुन झाली.
त्यानंतर नागपूर मुख्यालयी त्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या निभावल्या. नागपुरात सार्वजनिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य म्हणून काम करत असताना प्रशिक्षणार्थी वस्तीगृहाच्या प्रशस्त इमारतीचे भूमिपूजन तत्कालीन आरोग्य मंत्रीमहोदयांच्या हस्ते त्यांच्याच कारकिर्दीत संपन्न झाले होते जे वसतीगृह आज नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी जाणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे हक्काचे वास्तव्याचे ठिकाण बनले आहे. त्यानंतर कोविडच्या कालखंडात मॅडम मुंबई मुख्यालयी रुजू झाल्या. एकीकडे कोविड, गोवर यासारख्या संसर्गजन्य आजारांचा फैलाव वाढत असताना दुसरीकडे त्यांनी असंसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणाची सोपवलेली जबाबदारी यथायोग्य पार पाडली. संसर्गजन्य आजारांवर मात करत असताना राज्यातील आरोग्य यंत्रणेला त्यांनी असंसर्गजन्य आजारांच्या संभाव्य परिणामांपासून दुर्लक्षित होऊ दिले नाही. त्यामुळेच असंसर्गजन्य आजारांच्या संयुक्त सर्वेक्षण मोहिमा, माझे कूटुंब, माझी जबाबदारी यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून समोर आलेली रुग्णांची आकडेवारी एनसीडी कार्यक्रमाला नवी दिशा देणारी ठरली. कर्करोग, डायबेटीज, हायपरटेन्शन, मौखिक आरोग्य, अंधत्व निवारण यासारख्या कार्यक्रमांत डॉ जोगेवार मॅडमचे महत्वपूर्ण योगदान नाकारता येणार नाही. कार्यालयातील कामकाजाचा प्रचंड व्याप, बैठका यातूनही वेळ काढत आपल्या विभागातील डेटा अद्ययावत ठेवणे व क्षेत्रीय अधिकाऱ्यांसमवेत नियमितपणे आढावा घेणे त्यांनी खंडित होऊ दिले नाही. त्यामुळेच त्यांच्या विषयासंबंधित कुठल्याही कार्यक्रमाची अद्ययावत माहिती त्यांच्याकडे नेहमीच उपलब्ध असायची. कार्यालयीन कर्मचारी, सह अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मिळतेजुळते घेत सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला.
कामकाजाच्या निमित्ताने अनेकदा मॅडमना संपर्क करावा लागला, मा आयुक्त कार्यालयात काम करताना त्यांच्या हजरजबाबी व तत्पर वृत्तीमुळे एनसीडी कार्यक्रमाबाबत माहिती मिळवताना कधीही अडचण भासली नाही. त्यांच्या निवृत्तीनंतर एनसीडी कार्यक्रमाची जबाबदारी कोण सांभाळणार याची उत्सुकता असली तरी डॉ जोगेवर मॅडमशिवाय एनसीडी कार्यक्रम, येणारे काही दिवस तरी अपूर्णावस्थेतच वाटणार आहे. असो, काल सायंकाळी कार्यालयातून घरी जायला निघाल्यानंतर मॅडमच्या स्वेच्छानिवृत्तीची बातमी कानावर पडली आणि थोडा धक्काच बसला. नंतर खाली आल्यावर योगायोगाने मॅडमची कार्यालयाच्या प्रांगणातच भेट झाली. सवयीनुसार त्यांना माझ्या स्वलिखित "आरोग्यमंथन" पुस्तकाची शिदोरी दिली. सोबत सहसंचालक डॉ दुर्गादास पांडे सर, सहाय्यक संचालक डॉ उईके सर, डॉ माधुरी माथुरकर मॅडम व इतर सहकारी होते. येत्या काळात स्वग्रामी भंडारा येथेच एका रुग्णालयात रुग्णसेवेत राहण्याचा त्यांचा मनोदय आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेत २९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेला त्यांनी आज पूर्णविराम दिला. मॅडमचे भावी आयुष्य समाधानी व निरोगी जावो याच या निमित्त शुभेच्छा..
वैभव

Comments
Post a Comment