अनंत बोरसे यांच्या "अव्यक्त अनंत ६१" पुस्तकाचे शहापुरात प्रकाशन
आमचे निकटस्नेही व लेखन क्षेत्रातील आदर्श श्री अनंत बोरसे यांच्या "अव्यक्त अनंत ६१" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता शहापूर येथील कुमार शहा मंगल कार्यालयात मोठ्या दिमाखात पार पडला. या प्रसंगी आवर्जून उपस्थित राहत श्री बोरसे यांना मी पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर जेष्ठ पत्रकार जयंत माईनकर, साहित्यिक डॉ रसनकुट्टे, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, साहित्यिक प्रा राम नेमाडे, दै नवे शहरचे उपसंपादक श्री राजेंद्र घरत, पत्रकार महेश धानके, दत्ता खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सभागृहात श्री बोरसे यांचे कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रमंडळी व साहित्य क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती. कार्यक्रम आटोपल्यावर सर्वांसाठी त्यांनी सुग्रास भोजनव्यवस्थाही केली होती. श्री अनंत बोरसे यांचा माझा परिचय गेल्या चार पाच वर्षांपूर्वीचा. दोघेही नियमित वृत्तपत्रलेखन करत असल्यामुळे अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही एकत्र आलो. योगायोगाने त्यांचा भाचा प्रसाद माझ्याच कार्यालयात कार्यरत आहे. त्याच्या माध्यमातून एकमेकांची ख्याली खुशाली विचारणे अधूनमधून सुरू असते. अनंत बोरसे हे नाव दररोज कुठल्याही वृत्तपत्रीय वाचकांच्या रकान्यात वाचण्यात आले नाही असा एकही दिवस जात नाही. मूळगाव धुळ्याचे असलेले बोरसे बँकेच्या नोकरीतून सेवानिवृत्त प्रबंधक आहेत. शहापुरात स्थायिक असलेल्या बोरसे यांचे भाऊदेखील विविध ठिकाणी स्थिर स्थावर आहेत. नोकरीतुन निवृत्त झाल्यावर त्यांनी आपला लिखाणाचा छंद अगदी मनसोक्तपणे जोपासला आहे. आजवर त्यांची विविध वृत्तपत्रांतून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विषयांवर ५००० च्या वर पत्रे प्रकाशित झाली आहेत. पत्रकारितेतदेखील ते उत्तम भूमिका बजावत समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत आहेत. निवडक लेखांचे त्यांनी प्रकाशित केलेले 'अव्यक्त अनंत ६१' हे पुस्तक नक्कीच संग्रही ठेवण्याजोगे असून त्यांच्या कल्पक व भेदक विचारशक्तीची जाणीव करून देणारे आहे. वयाच्या साठीनंतर फार कमी लोकांना सामाजिक जाणिवेतून सक्रिय राहण्याची मानसीकता मिळते व अशा लोकांमध्ये बोरसे सरांचे नाव मी अग्रक्रमाने घेईन. त्यांचे सर्व लेख अभ्यासपूर्ण व त्यांच्या अनुभवसंपन्नतेची जाणीव करून देतात. शॉपीजन या साईटच्या माध्यमातून त्यांनी प्रकाशित केलेले त्यांचे पुस्तक उत्तम झाले असून याच माध्यमातून पुस्तके प्रकाशित करण्याची कल्पना व पद्धतदेखील त्यांनी मला समजावून सांगितली. यावेळी त्यांचा शाल व सवयीप्रमाणे माझे 'आरोग्यमंथन' देऊन सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांचे लिखाणातील सातत्य असेच टिकून राहो व ते पुस्तकांच्या माध्यमातुन बहरत जावो हीच मनोकामना.
वैभव
Comments
Post a Comment