डॉ एकनाथ भोसले यांच्या "महिला: आरोग्य व योजना" पुस्तकाचे आरोग्य भवन येथे प्रकाशन
*डॉ एकनाथ भोसले यांच्या "महिला: आरोग्य व योजना" पुस्तकाचे प्रकाशन*
सार्वजनिक आरोग्य विभागात सन २०११ पासून मुख्य प्रशासकीय अधिकारी या पदावर कार्यरत डॉ एकनाथ मालोजी भोसले यांच्या "महिला: आरोग्य व योजना" या पुस्तकाचे आज आरोग्य भवन येथे आरोग्य संचालक डॉ स्वप्नील लाळे, सहसंचालक डॉ विजय कंदेवाड, श्रीमती रेहना काझी, डॉ दुर्गादास पांडे, सहायक संचालक डॉ दुर्योधन चव्हाण, डॉ उमेश शिरोडकर, श्रीमती करुणा सुरवाडे व विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. मूळचे हाडाचे शिक्षक असलेल्या डॉ भोसले हे आरोग्य विभागातील एक साहित्यदूतच आहेत. शासनाकडून महिलांच्या आरोग्यासाठी राबविल्या जात असलेल्या विविध योजना सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. त्याचे संकलन करण्यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड दीडेक वर्षांपासून मी पाहत आहे. यासाठी मी माझे आरोग्यमंथन हे पुस्तकदेखील त्यांना उपलब्ध करून दिले ज्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या पुस्तकात आवर्जुन केलेला आहे. मा आयुक्त, मा संचालक व काही मान्यवरांच्या शुभेच्छादेखील त्यांच्या पुस्तकास लाभलेल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०११ पासून नामनिर्देशनाने आरोग्य विभागात रुजू झालेल्या डॉ भोसले यांचा नम्र व प्रामाणिक स्वभाव मला विशेष भावला. लिखानाकडे त्यांची असलेली ओढ आम्हाला अधिक जवळ घेऊन आली. महिलांच्या आरोग्याचा विषय घेऊन त्यांनी पुस्तक प्रकाशनाचा केलेला प्रयोग त्यांच्या शोधक कल्पनाशक्तीची जाण करून देणारा आहे. समाजशास्त्र, लोक प्रशासनासारखे विषय घेऊन संपादन केलेल्या उच्च शिक्षणाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न काबिलेतारीफच आहे. आज अत्यंत साधेपणाने पुस्तक प्रकाशनाचा केलेला अनुकरणीय उपक्रम त्यांच्या उच्च विचारसरणीवर कळस चढवणारा आहे. विचार व साहित्यसाठ्याचा खुला केलेला हा खजिना भविष्यात अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याने हा सिलसीला त्यांनी आरोग्य व इतर सामाजिक विषय घेऊन यापुढेही सुरू ठेवावा अशा मनोमन वाटते. डॉ एकनाथ भोसले यांच्या पुढील साहित्यिक प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..
वैभव
Comments
Post a Comment