जय जय महाराष्ट्र माझा
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचं दुसरं आणि तिसरं कडवं आता राज्यगीत म्हणून गायलं जाणार आहे. गीतकार राजा बढे यांनी लिहिलेलं श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत शाहीर साबळे यांनी आपल्या खणखणीत आवाजात गायलेलं आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी म्हणजे १ मे १९६० रोजी दादर येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गाणे शाहीर साबळे यांनी पहिल्यांदा गायलं. आज राज्याचे राज्यगीत म्हणून त्याचा गौरव झाल्यानं या गीताला खऱ्या अर्थाने राजवैभव प्राप्त झाले आहे. देशातील १२ राज्यांना स्वतःचं असं राज्यगीत आहे, त्यात आता महाराष्ट्राचा समावेश झाला आहे. दोन कडव्यांचे एक मिनिट 45 सेकंदाचे हे राज्य गीत असणार आहेत. 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत गाताना महाराष्ट्रवासीयांचा ऊर भरून येतो. मराठी माणसांच्या या अभिमानगीताला आता महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा मिळाला आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून 19 फेब्रुवारीपासून हा निर्णय अंमलात येणार आहे. राष्ट्रगीताबरोबर आता राज्यात हे राज्यगीत गाण्यात येणार आहे. प्रेरणागीत, स्फूर्तीगीत म्हणून या गाण्याची ओळख असून मागील अनेक दशकांपासून अवघ्या महाराष्ट्राला या गाण्याने वेड लावले आहे. कितीही वेळा गायले, ऐकले तरी या गाण्याने एक वेगळी ऊर्जा मराठी माणसाच्या अंगात संचारते. त्यामुळे अनेक कार्यक्रमांमध्ये हे गीत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी वाजवण्यात येते. राज्यगीतासाठी सर्वात समर्पक ठरलेलं हे गीत आता अधिकृतपणे शासन व इतर सर्वच ठिकाणी सन्मानाने गायले जाणार आहे. शासनाचा हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून महाराष्ट्राला राज्यगीताच्या रुपात मौल्यवान ठेवा उपलब्ध करून देणारा आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा II
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment