नैसर्गिक उपचारांचे गुणकारी आरोग्य केंद्र

स्नेहलता निसर्गोपचार केंद्र 
आरोग्यासाठी एक आवाज, निसर्गाच्या सानिध्यात
शनिवारी पनवेलनजीकच्या स्नेहलता निसर्गोपचार केंद्रास भेट देण्याचा योग आला. निसर्गोपचार ही पद्धती तशी आपल्या समाजात फार दृढ नाही. मात्र निसर्गनियम झुगारून केलेल्या वर्तनामुळे जडलेल्या व्याधी दूर करण्यासाठी थकलेले लोक अखेरचा उपाय म्हणून ह्या कमी खर्चिक, नैसर्गिक संसाधन वापराच्या व सोप्या पद्धतीच्या निसर्गोपचाराकडे वळत आहेत. यासाठीच निरोगी शरीरासाठी स्नेहलतासारख्या निसर्गोपचार केंद्राचे महत्व आगामी काळात नक्कीच वाढणार आहे. शांतीवनच्या कुष्ठरोग निवारण समितीच्या जवळपास ७५ एकर विस्तीर्ण जागेवर पसरलेला हा परिसर कमालीचा शांत, नैसर्गिक व मानसिक शांतता देणारा आहे. ८०च्या दशकामध्ये कुष्ठरोग पीडित रुग्णांची संख्या वाढती असताना संस्थेने यातील काही एकर जागा रुग्णांवरील उपचारासाठी विकत घेतली व शासनाकडून मिळालेल्या उर्वरित जागेवर सध्या कुष्ठरोग उपचार केंद्र, वृद्धाश्रम, आधार केंद्र, आदिवासी आश्रमशाळा, बालवाडी, गौशाला, निसर्गोपचार केंद्र यांसारखे उपक्रम सुरू आहेत. संस्थेच्या कार्याबद्दल जाणून घेण्याच्या इर्षेने संस्थेच्या उपाध्यक्ष व निसर्गोपचार केंद्राच्या संचालिका डॉ कुमुद जोशी मॅडम यांच्याशी आमचे कार्यालयीन सहकारी डॉ सुभाष घोलप यांनी संपर्क केला व शनिवारच्या भेटीची वेळ निश्चित केली. त्यानुसार आम्ही पनवेलपासून ७ ते ८ किलोमीटर अंतरावरील ह्या निसर्गरम्य परिसरात सकाळी ११ च्या सुमारास पोहोचलो. शांतीवनचा हा संपूर्ण परिसर माथेरानच्या डोंगरमाथ्याचे दर्शन घडवणारा नावाप्रमाणेच कमालीचा अत्यंत शांत व निसर्गरम्य आहे. सगळा परिसर आम्ही न्याहाळत निसर्गोपचार केंद्रात पोहोचलो. तेथे उपस्थित डॉ जोशी मॅडम तसेच संस्थेचे ट्रस्टी व पनवेलचे माजी नगराध्यक्ष श्री भाटिया यांचेबरोबर तासभर संस्थेचे कार्य व उपक्रम याबद्दल गप्पा मारल्या. त्यानंतर केंद्रातील निवासी डॉक्टर कटरा यांनी आम्हाला निसर्गोपचार केंद्रातील विविध थेरपी कक्ष व उपचारांविषयी माहिती दिली. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र थेरपी कक्ष इथे बनवण्यात आलेले आहेत ज्यात अत्याधुनिक यंत्रणा सध्या बसवण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी डायबेटीस, आस्थमा, पॅरॅलीसिस, उच्च रक्तदाब, त्वचारोग, सांधेदुखी, पाठदुखी, पायांचे दुखणे तसेच महिलांच्या विविध समस्यांवर यशस्वीपणे उपचार केले जातात. या सर्व व्याधींवर या ठिकाणी दहा दिवसांचा निवासी कोर्स घेतला जातो. त्यात रुग्णाला विविध थेरपिंसह योग्य डाएट दिला जातो ज्याद्वारे रुग्णाला पूर्ण आराम मिळून त्याच्या व्याधींवर  फरक पडल्याचे अनेकांकडून ऐकायला मिळाले. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांशीदेखील आम्ही यावेळी संवाद साधला. सध्या अंदुरे, दामले, शाह ही दाम्पत्ये या ठिकाणी विविध व्याधींसाठी उपचार घेत आहेत. त्यातील दामले हे अमेरिकस्थित दाम्पत्य खास नैसर्गिक पद्धतीच्या उपचारांसाठी इथे दाखल झाले आहे. त्यांच्याशी बोलल्यावर ते येथील नैसर्गिक उपचारपद्धतीबाबत पूर्णतः समाधानी असल्याचे दिसून आले. यातील काही कुटुंबे तर नियमित पणे इथे भेट होऊन प्रतिबंधात्मक थेरपी घेत असल्याचे पाहायला मिळाले. स्टीम बाथ, मसाज, मढ बाथ, हिप बाथ, इनिमा यांसह अनेक थेरपी या ठिकाणी निवासी रुग्णांसाठी देण्यात येतात. तर ओपीडी रुग्णांसाठीदेखील ५०० ते ७०० रुपयांमध्ये यातील ४-५ प्रकारच्या थेरपी घेता येतात. संस्थेच्या वतीने ह्या संपूर्ण परिसरात राबवण्यात येणारे उपक्रम गरजू व्यक्तींसाठी वरदान ठरत आहेत. आश्रम शाळेत ५५० मुले शिकत आहेत, आधार केंद्रात जवळपास ४० निराधार राहत आहेत, ५० गाई गौशाळेत आहेत, वृद्धाश्रमात ५० वृद्ध तर रुग्णालयात ४०-५० कुष्ठरुग्ण उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. हे निसर्गोपचार केंद्र  मुंबई पासून अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने व नाममात्र दरात म्हणजे १० दिवसांच्या कोर्ससाठी राहणे, जेवण व उपचार, थेरपी सह १०००० रुपयांपासून उत्तम सोयी सुविधांयुक्त पॅकेज उपलब्ध असल्याने दीर्घकालीन उपचारांच्या लोकांसाठी हे निसर्गोपचार केंद्र उत्तम पर्याय आहे. संपूर्णतः नैसर्गिक व कमी खर्चिक उपचारांमुळे सर्व स्तरांतील विविध व्याधींच्या लोकांनी या केंद्राला भेट द्यायलाच हवी. शरीराला पूर्ण शुद्ध करण्याचे तंत्र या ठिकाणी वापरले जाते.  निसर्गरम्य ठिकाणी वास्तव्याची व उपचारांची विलक्षण अनुभूती या ठिकाणी घेता येईल. सेवाभावी वृत्तीने व मनमिळाऊ स्वभावाने काम करणाऱ्या येथील सर्वच कर्मचाऱ्यांचा खरेतर हेवा वाटला. दुपारी जोशी मॅडम व भाटिया सरांसोबत येथील प्रमिला ताई व इतर सुगरणींच्या हातचा सुग्रास जेवण-फराळाचा आस्वाद घेऊन आम्ही सर्वांचा निरोप घेतला. येथील भोजनदेखील नैसर्गिक भाज्या व पदार्थांचा वापर करून अत्यंत साध्या पद्धतीने मात्र रुचकर बनवले जाते. डॉ कुमुद जोशी या देखील लोकमत समूहाच्या वतीने त्याच दिवशी सायंकाळी आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी आमच्या मागोमाग निघाल्या. परतीच्या वाटेवर आम्ही पुन्हा एकदा संपूर्ण परिसर बारकाईने न्याहाळत या ठिकाणी पुन्हा भेट देण्याच्या संकल्पासह शांतीवनाचा निरोप घेतला.


वैभव मोहन पाटील

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त