सकारात्मक हेतूने चित्रपटांना अनुदान
ऐतिहासिक चित्रपटांना गेल्या काही वर्षांपासून दर्शकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद दिलासादायक आहे. त्यामुळेच या श्रेणीतील अनेक चित्रपट चांगले यश मिळवत आहेत. ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात समाज घडवण्याचे कार्य करणाऱ्या व सामाजिक विषयांवरील चित्रपटांना १ कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. वाद विवाद, प्रेमप्रकरणे, भांडणे, गुन्हेगारीतील रहस्य व अश्लीलतेकडे झुकत चाललेल्या चित्रपटसृष्टीला पुन्हा समाजप्रबोधनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाचा हा प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह म्हणावा लागेल. चित्रपट आज केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेला नाही तर ज्ञान व प्रबोधनाचे उत्तम माध्यमही आहे. समाज घडवण्यास मोलाचा हातभार लावलेल्या महान व्यक्तींवर चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांच्या आणि सामाजिक विषयांवरील चित्रपटांच्या निर्मितीसाठी शासन अर्थसहाय्य देणार असल्याची बाब स्वागतार्हच आहे. मात्र अशा प्रकारच्या ऐतिहासिक चित्रपटांच्या कथानकावरून अलीकडच्या काळात उद्भवलेले वाद चिंतेची बाब आहे. त्यामुळे ऐतिहासिक घटना दाखवणाऱ्या चित्रपटांची सत्यता तपासणारी यंत्रणादेखील असायला हवी. तथापि, अशा कलाकृतींच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील असलेल्या मात्र निधीअभावी अडकून पडलेल्या दिग्दर्शक, निर्मात्यांसाठी ही बाब दिलासादायक आहे. यातून भावी पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल व समाजात चित्रपटांच्या माध्यमातून सुसंस्कारित वातावरण तयार होण्यास मदत होईल. सुसंस्कारित समाज घडवण्यासाठी शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा हा निर्णय भविष्यात चांगले, दर्जेदार व वस्तुनिष्ठ कथानके दाखवणारे चित्रपट व मालिका टीव्ही व पडद्यावर आणेल अशी आशा करण्यास हरकत नाही.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment