भटक्या कुत्र्यांची दहशत

मुंबई व उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस अधिक फोफावत आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी महापालिकांनी निर्बिजीकरण मोहीम सुरू केली असली तरी या मोहिमेच्या अपयशामुळे कुत्र्यांची दहशत वाढतीच आहे. गेल्या दोन वर्षांत भटक्या कुत्र्यांनी तब्बल एक लाख १२ हजार ७६९ मुंबईकरांचा चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर सन २०१४ ते डिसेंबर २०२२ पर्यंत तीन लाख ८८ हजार ४२० भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. यावरून मुंबईतील भटक्या कुत्र्यांची वाढत असलेली प्रचंड संख्या आपल्या लक्षात येईल. कुत्र्यांना जखम झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर देवनार येथील प्राण्यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात येते. सात दिवसांनंतर तपासणी केल्यावर प्रकृती स्थिर असल्यास आहे, ज्या ठिकाणांहून आणले त्या ठिकाणी पुन्हा सोडण्यात येते. कुत्र्याने चावा घेतलेल्या व्यक्तीला रेबीज होण्याचा धोका असतो. त्यामुळे चावा घेतल्यानंतर तातडीने इंजेक्शनचा कोर्स करणे आवश्यक असते. दुर्लक्ष केल्यास संबंधिताच्या जिवावर बेतू शकते. निर्बिजीकरण न केलेली कुत्र्याची एक मादी एका वेळेस चार पिलांना जन्म देते. त्यामुळे मुंबईत श्वानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाने घालून दिलेल्या निर्देशांन्वये वर्षाला ३० टक्के श्वानांचे निर्बिजीकरण करत श्वान नियंत्रणासाठी पालिका उपाययोजना करत आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण वाढवण्यावर जोर दिला जात असला तरी सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या पाहिली तर या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. सर्वसामान्य लोकांना प्रचंड त्रासदायक ठरत असलेल्या ह्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकांनी अद्ययावत व परिणामकारक यंत्रणा अंमलात आणायला हवी. अन्यथा भटक्या कुत्र्यांचा हा भस्मासुर भविष्यात अधिक तापदायक ठरणारा आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त