आरोग्य क्षेत्रातील डिजीटल क्रांतीचे आभा कार्ड
आरोग्य क्षेत्रातील डिजीटल क्रांतीचे
आभा कार्ड
वैदयकीय उपचार दिवसेंदिवस अत्यंत खर्चिक व गुंतागुंतीचे होत आहेत. नवनवीन आजारांचा शिरकाव व त्या अनुषंगाने बदलती उपचारपध्दती यामुळे वैदयकीय सेवा अधिकच किचकट होऊ पाहत आहे. यात बहुतांश रुग्ण वैदयकीय सेवांबाबतच्या संभ्रमामुळे उपचारांबाबत अनभिज्ञ असतात. यामुळे एखादया ठराविक आजारावर कुठुन उपचार घ्यावेत, त्याचा खर्च किती असेल, उपचारांचा कालावधी किती राहील, आजाराच्या पार्श्वभुमीबाबतचे अज्ञान यामुळे रुग्ण गोंधळलेल्या स्थितीत असतो. यामुळे उपचारांसाठी एकापेक्षा अधिक वैदयकीय संस्था व पध्दतींचा वापर केला जातो. यामध्ये आजाराचे निदान होण्यास व त्याचा इतिहास जाणण्यास विलंब लागतो. याचा विपरीत परिणाम गंभीर आजारांच्या रुग्णोपचारावर संभवतो. त्यामुळे रुग्णाला जडलेल्या एखादया दिर्घकालीन आजारावर उपचार होण्यासाठी प्रचंड अडचणी उदभवतात. यावर मात करण्यासाठी केंद्र शासनाने डिजीटल पध्दतीचा वापर करत प्रत्येक व्यक्तीची आरोग्याची माहिती संकलित करणारी स्तुत्य योजना अंमलात आणलेली आहे. आरोग्य विभागाचे महत्वपूर्ण उपक्रम डिजीटल करण्याच्या उददेशाने आयुष्यमान भारत डिजिटल अभियान (ABDM) या योजनेची सुरुवात मा. पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून 27 सप्टेंबर २०२१ रोजी पूर्ण देशभर करण्यात आली. या योजनेद्वारे सर्व नागरिकांना सुरक्षित, सर्वसमावेशक, परवडणारी पायाभूत आरोग्य सुविधा डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या डिजिटल माध्यमाद्वारे आरोग्य विषयक डेटा बेस तयार करून त्याच्या मदतीने सर्व आरोग्य सुविधा नागरिकांना सहजपणे उपलब्ध होतील. आयुष्यमान भारत डिजिटल अभियान माध्यमातून देशातील सर्व आरोग्य संस्था, वैद्यकीय व्यवसायिक, आरोग्य कर्मचारी, औषधी वितरक यांची नोंदणी करून आरोग्य विषयक सर्व माहितीचे डिजिटल माध्यमाद्वारे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. आभा हे आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा एक भाग असुन या कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड म्हणजेच आभा कार्ड तयार करीत आहे. हेल्थ कार्डमध्ये आधार कार्डप्रमाणे प्रत्येक नागरिकाला १४ अंकी आभा नंबर मिळतो. या कार्डमध्ये रुग्णाची आरोग्याशी संबंधीत संपुर्ण माहिती नोंदवली जाते. या कार्डच्या मदतीने डॉक्टर रुग्णाच्या संपुर्ण आरोग्याच्या नोंदी पाहू शकतात. म्हणजेच या कार्डव्दारे कोणत्याही रुग्णाचा वैदयकीय इतिहास आरोग्य उपचारासाठी शोधता येणार आहे. राज्यामध्ये आजवर सुमारे दोन कोटीपेक्षा जास्त लोकांचे आभा कार्ड बनविण्यात आलेले आहेत. तसेच राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांची नोंदणी सदर अभियानांतर्गत करण्यात आलेली असून वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणीदेखील करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आभा कार्डच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात एक नवी क्रांती घडत आहे. या कार्डवरील डिजीटल माहितीव्दारे रुग्णावर उपचार करणे अधिक सोयीचे होणार असल्याने वैदयकीय क्षेत्रालादेखील त्याचा मोठा लाभ होणार आहे. उपचारासाठी रुग्ण देशभरातील कुठल्याही रुग्णालयामध्ये उपचारासाठी गेल्यास आभा कार्डवरील आरोग्य नोंदीव्दारे त्याच्या आजाराचा इतिहास तपासणे व त्याव्दारे उपचार सुरु करणे जलद व सोयीचे ठरणार आहे. त्यामुळेच येणा-या काळात युनिक हेल्थ कार्ड म्हणजेच आभा कार्ड आरोग्य सेवेतील मुलभुत घटक ठरणार असल्याने अधिकाधिक नागरीकांनी सदर कार्ड तयार करुन घेणे श्रेयस्कर आहे.
वैभव मोहन पाटील
कक्ष अधिकारी (अभियान संचालक कक्ष)
Comments
Post a Comment