राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ अरुण थोरात सेवानिवृत्त

रक्तसंकलन व रक्तपुरवठ्यामध्ये बजावली मोलाची भूमिका
राज्य रक्त संक्रमण परिषदेमध्‍ये सहायक संचालक पदावर कार्यरत असणारे डॉ. अरुण थोरात हे नियत वयोमानानुसार काल ३१ मार्च रोजी ३२ वर्षांच्‍या प्रदिर्घ सेवेनंतर शासकीय सेवेतून सेवानिवृत्‍त झाले. मुळचे जालन्‍याचे असलेले डॉ थोरात यांचे औरंगाबाद येथील शासकीय वैदयकीय महाविदयालयात एमबीबीएसचे शिक्षण पार पडले. त्‍यानंतर त्‍यांनी अंबाजोगाई, जि. बीड येथील एसआरटीआर मेडीकल कॉलेज येथुन एमडी पॅथॉलॉजीचे शिक्षण घेतले. औरंगाबाद जिल्‍हयातील प्राथमिक आरोग्‍य केंद्र पिशोर या आरोग्‍य केंद्रापासून त्यांनी शासकीय वैद्यकीय सेवेची सुरुवात केली. पदव्‍यूत्‍तर शिक्षणानंतर त्‍यांची नियुक्‍ती उल्‍हासनगर येथील मध्‍यवर्ती रुग्‍णालयात करण्‍यात आली. मागील पाच वर्षांपासुन राज्‍य रक्‍त संक्रमण परिषदेची धुरा त्‍यांनी यशस्‍वीपणे सांभाळली आहे. या दरम्‍यान राज्‍यातील रक्‍तसाठे, रक्‍तदान मोहिमा, रक्‍ताचा तुटवडा याबाबत उपस्थित होणा-या प्रश्‍नांवर त्‍यांनी अत्‍यंत कुशलतेने व अनुभवसंप्‍पनतेने मार्ग काढत रक्‍तदानाची चळवळ अविरतपणे सुरु ठेवली. कोरोनासारख्‍या महामारीत राज्‍यातील रक्‍तपेढया व रुग्‍णालयांना आवश्‍यक रक्‍त पुरवठा यामध्‍ये योग्‍य समन्‍वय राखण्‍यात त्‍यांनी मोलाची भुमिका बजावली. रक्‍तपेढयांना आवश्‍यक मार्गदर्शिका देत त्‍यांचेवर योग्‍य संनियंत्रण राखत ते शासन व रक्‍तपेढया यांचेमध्‍ये दुवा म्‍हणून काम करत राज्‍यातील रक्‍तपुरवठा सुरळीत ठेवण्‍यासाठी प्रयत्‍नशील राहिले. 
रक्‍त परिषदेच्या कामामध्ये त्‍यांनी अमूलाग्र बदल घडवले जसे की e-raktkosh संकेत स्थळावर सर्व दैनंदिन रक्त साठा अद्यावत ठेवणे, रक्त साठ्याची माहिती रक्तकेंद्राच्या दर्शनी भागात लावणे, प्रक्रिया शुल्काची माहिती नोटिस बोर्डावर लावणे, अनियमता करणाऱ्या रक्तकेंद्रावर कारवाई करणे, जे. जे. महानगर रक्तकेंद्राचे आधूनिकरण, खारघर येथील प्रस्तावित प्रशिक्षण केंद्राचे काम पूर्णत्‍वास नेणे, थॅलेसेमिया  रुग्णांना नियमित रक्त पुरवठा होण्यासाठी डे केअर सेंटर ला रक्तकेंद्र जोडणे, नवीन रक्तकेंद्र स्थापन करणे साठी मार्गदर्शक सूचना तयार करणे, कोरोना काळात रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे, मोठ मोठी रक्तदान शिबिरे आयोजित करणे, रक्तदात्यांचा व शिबिर संयोजकांचा सत्कार करणे इत्यादी उल्‍लेखनिय कामे झाली. मध्‍ये काही काळ त्‍यांच्‍या आजारपणाचा सोडला तर त्‍यांनी विभागासाठी अत्‍यंत झोकुन देऊन काम केले. 
डॉ. थोरात यांचा मृदू हसतमुख स्‍वभाव, सर्वांशी मिळून मिसळून राहण्‍याच्‍या सवयीमुळे त्‍यांचे नेहमीच कार्यालयातील  सर्वांशी सलोख्‍याचे व सौहार्दपूर्ण संबंध राहीले. आरोग्‍य विभागातील सर्व अधिका-यांशी त्‍यांचे अत्‍यंत जिव्‍हाळयाचे संबंध होते. कुणाला रक्‍तपुरवठयाबाबत कधीही अडचण उदभवली तर त्‍याला तातडीने मदत मिळवून दिल्‍याचा अनुभव त्‍यांचेबाबतीत मी स्‍वतः घेतला आहे. आज त्‍यांच्‍या सेवानिवृत्‍तीप्रित्‍यर्थ सवयीप्रमाणे त्‍यांना माझे आरोग्‍यमंथन हे पुस्‍तक भेट देत निरोप दिला. सोबत सहाय्यक संचालक डॉ महेंद्र केंद्रे व डॉ प्रकाश पाडवी हेदेखील उपस्थित होते. अशा हया प्रामाणिक, पारदर्शी व कामाप्रति कर्तव्‍यदक्ष अधिका-यास भावी निरोगी आयुष्‍यासाठी मनःपूर्वक शुभेच्‍छा..           

वैभव

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त