हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
राज्यातील गरीब, गरजू व दुर्बल घटकांपर्यंत मोफत व परिणामकारक आरोग्य सेवा पोहोचावी यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सर्व प्रकारच्या आरोग्‍य सुविधा जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात उपलब्ध व्हाव्यात यासाठी देशभरासह महाराष्ट्रातदेखील 'आरोग्यवर्धिनी केंद्र' ही योजना राबविण्यात येत असून राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व शहरी भागातील नागरी आरोग्य केंद्रांचा या योजनेच्या माध्यमातून कायापालट करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यभरातील हजारो सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये महत्वपूर्ण व गरजेच्या आरोग्य सेवा नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येत असून याद्वारे रुग्णांना आपल्या जवळपासच्या शासकीय दवाखान्यातच सर्व प्रकाराचे उपचार मिळू लागले आहेत. याचाच पुढचा टप्पा म्हणून आता 'हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेची आखणी व नियोजन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आहे. आपला दवाखाना हा उपक्रम म्हणजे सरकारचे आरोग्य क्षेत्रातील महत्वपूर्ण पाऊल असून त्यायोगे सार्वजनिक आरोग्य सेवेत क्रांती घडवण्याचा सरकारचा मानस आहे. शहरी भागातील अनेक नागरी आरोग्य केंद्रे ही आदिवासी, झोपडपट्टी भागापासून दूर अंतरावर असतात, त्यांच्या कामकाजाच्या वेळादेखील ठराविक असल्याने वेळेनंतर उपचार घ्यायला गेलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यास अडचणी निर्माण होतात. तसेच आज वाढलेले संसर्गजन्य-असंसर्गजन्य व साथीच्या आजार लक्षात घेता रुग्णांची संख्याही वाढली आहे, त्यामुळे सरकारी दवाखाने सदैव रुग्‍णांनी हाऊसफुल्ल असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर शहरी भागातील वाढत चाललेल्या स्थलांतरामुळे शहरी लोकसंख्या व पर्यायाने रुग्णसंख्याही प्रचंड वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर 'हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' ही संकल्पना नागरिकांना आरोग्यासाठी एक प्रकारचा दुवा म्हणून काम करणार आहे. सध्या ठाणे, मुंबई यांसारख्या महानगरांमध्ये हे दवाखाने कार्यरत आहेत. ठाण्यात एकूण ४२ तर मुंबईत ५० पेक्षा अधिक दवाखाने आरोग्य सेवांपासून वंचित राहिलेल्या भागांत नागरिकांना आरोग्य सेवा देत आहेत. ठाण्यातील जवळपास १५ लाखांच्या वर लोकांनी या दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवांचा लाभ घेतलेला आहे. मुंबईतदेखील या उपक्रमाचा विस्तार करण्याची कार्यवाही सुरू आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या उपक्रमाचा आता वटवृक्ष होताना दिसत असून ९ फेब्रुवारी रोजी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात आपला दवाखाना स्थापन करण्याची घोषणा त्यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या भव्य समारंभात करण्यात आली. त्यामुळे या योजनेचा विस्तार आता राज्यभर होणार आहे. लोकांना घराजवळ सुसज्ज असे दवाखाने उपलब्ध होणार असल्याने त्यांची उपयुक्तता नक्कीच वाढणार आहे. प्राथमिक उपचार, संदर्भ सेवा, औषधे, टेलीकन्सल्टंशन, समुपदेशन, विशेषज्ञ यांसारख्या सेवा याठिकाणी मोफत उपलब्ध असतील. डॉक्टर, अधिपरिचरिका, एमपीडब्लू, सफाई कामगार असा स्टाफ या दवाखान्यात कार्यरत असेल. विविध प्रकारच्या विशेषतज्ञांच्या सेवा देखील ठराविक दिवशी इथे मिळणार असल्याने स्पेशियालिस्ट डॉक्टर शोधण्यासाठी लोकांची वणवण थांबणार आहे व त्यासोबत आर्थिक बचतदेखिल होणार आहे. विविध रक्त चाचण्यादेखील येथे बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध असतील. याचा लाभ प्रामुख्याने सर्वसामान्य व गरीब रुग्णांना होणार असल्याने या योजनेचा सकारात्मक परिणाम शहरी भागांतील झोपडपट्टी व गरीब वस्त्यांमध्ये लवकरच दिसून येईल यात शंका नाही. गोरगरीब रुग्णांना आरोग्यसेवा घराच्या जवळपास उपलब्ध व्हावी यादृष्टीने हे दवाखाने सुरू करण्यात येत आहेत. वास्तवीकता दिल्ली सरकारने राजधानी दिल्लीत राबवलेल्या 'मोहल्ला क्लिनिक' या संकल्पनेच्या धर्तीवर ही योजना राबवण्यात येत आहे ज्याचा फायदा लाखो गोरगरीब, गरजू रुग्णांना होणार आहे. उत्तम दर्जाच्या सहजसाध्य, माफक व दर्जेदार आरोग्य सेवा राज्यातील जनतेला पुरवण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असून अशा प्रकारच्या लोककेंद्रित उपक्रमांमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची रुग्णसेवेच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल निश्चितपणे आश्वासक आहे. 


वैभव मोहन पाटील
कक्ष अधिकारी (अभियान संचालक कक्ष), राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त